कोयनानगर : पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी येथे दरडग्रस्तांसाठी कायमच्या पुनर्वसनासाठी घरे बांधण्यात येत आहेत.या घरांची व पाटणच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी मंगळवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली. दरडग्रस्तांसाठी घरे बांधताना आकर्षक पध्दतीने बांधावी अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात तीन वर्षांपूर्वी झालेल्या भूसल्खनामध्ये शिद्रुकवाडी गावाचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबे उध्दवस्त झाली. या गावाच्या कायमच्या पुनर्वसनासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कायमची घरे बांधण्याचे काम सुरू आहॆ. याठिकाणी चाललेल्या व पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणी केली. शिद्रुकवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या घरात निसर्गाने उध्वस्त केलेले दरडग्रस्त राहणार आहेत. त्यामुळे ही घरे आकर्षक पध्दतीने उभी करावीत. ही दोन्ही कामे करताना ठेकेदाराने गुणवत्ता व दर्जाची तडजोड करू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, उपअभियंता एस. वाय. शिंदे, शाखा अभियंता अरुण जाधव आदी उपस्थित होते.