Pune District : सोसायट्यांच्या ठरावांवरून जिल्हा बँकेचे राजकारण रंगले
Pune District : बँकेने 2026-27 ते 2031-32 या कालावधीतील संचालक मंडळ निवडणुकीसाठी सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

आळेफाटा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात सहकारी विकास सोसायट्यांच्या प्रतिनिधी ठरावांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी गावोगावी संपर्क वाढवत सोसायटी पदाधिकारी व सभासदांच्या भेटीगाठी सुरू केल्याने निवडणुकीपूर्वीच तालुक्यातील सहकाराचे राजकारण रंगू लागले आहे. बँकेने 2026-27 ते 2031-32 या कालावधीतील संचालक मंडळ निवडणुकीसाठी सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जुन्नर तालुक्यात 78 सहकारी विकास सोसायट्या असून, एका कृषक सहकारी सोसायटीसह ही संख्या 79 असल्याचे सांगण्यात येते. या संस्थांमधून होणार्या प्रतिनिधींच्या ठरावांना आगामी निवडणुकीत महत्त्व असल्याने आपल्या पसंतीच्या व्यक्तीच्या नावाचा ठराव व्हावा, यासाठी संभाव्य उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत.
तालुक्यातील सुमारे 55 सोसायट्या जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याची माहिती सहकार क्षेत्रातून दिली जात आहे. त्यामुळे प्रतिनिधी ठराव करताना पात्र सभासदांची निवड करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, तालुक्यात नेमक्या किती सोसायट्या थकबाकीदार आहेत, याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा बँक किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून ही माहिती उपलब्ध न झाल्याने या प्रक्रियेबाबतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, ‘अ’ वर्गातील संस्थांमधून प्रतिनिधी निवडण्यासाठी इच्छुकांकडून गावोगावी संपर्क सुरू आहे. कोणत्या गटाच्या बाजूने किती ठराव होतात, यावर तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरण्याची शक्यता आहे. मात्र ठरावांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार असल्याने जुन्नरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष आता प्रतिनिधी निवडीकडे लागले आहे.
16 सप्टेंबरअखेर 46 ठराव दाखल
जुन्नर सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कार्यालयात 16 सप्टेंबरअखेर विकास सोसायट्यांचे 29, ‘क’ वर्गातील संस्थांचे 10, तर ‘ड’ वर्गातील संस्थांचे सात प्रतिनिधी ठराव प्राप्त झाले आहेत. ‘ब’ वर्गातील संस्थांचा एकही ठराव अद्याप प्राप्त झालेला नाही. सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांनी ही माहिती दिली.
‘अ’ वर्गातील लढतीकडे लक्ष
जुन्नर तालुक्यातून ‘अ’ वर्ग गटात जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक संजय काळे यांची पुन्हा निवडणूक लढण्याची चर्चा आहे. त्यांच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांमध्ये आमदार शरद सोनवणे आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण यांच्या नावांची चर्चा होत आहे. बँकेच्या संकेतस्थळावरील विद्यमान संचालक मंडळात संजय काळे यांचा समावेश आहे.





