Babasaheb Patil : दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदतीला वेळ लागणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे वक्तव्य
राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, या निर्णयानंतर प्रत्यक्ष मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याचे वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी परभणी येथे केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Babasaheb Patil : राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र, या निर्णयानंतर प्रत्यक्ष मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याचे वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी परभणी येथे केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तसेच, नुकसानभरपाईचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकार दिवाळीपूर्वी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करण्याचे नियोजन करत आहे, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) म्हणाले, राज्यात याआधी कधीही पाहिला नाही असा भीषण दुष्काळ यंदा आहे. विद्यार्थ्यांची फी, टँकरची मागणी, वीज बिल यासह सर्व प्रकारची मदत केली जाईल.
एकही शेतकरी वंचित राहणार नाही, मात्र प्रत्यक्ष मदत वितरणात काही तांत्रिक अडचणी असल्याने थोडा वेळ लागेल. या वक्तव्यावर ठाकरेसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दांत टीका केली. मंत्री मदत उशिरा मिळेल असे म्हणत असतील, तर ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. सॅटेलाइटमधून शेतकऱ्यांच्या वेदना दिसणार नाहीत, त्यामुळे कागदी उपाययोजना न करता तातडीने प्रत्यक्ष मदत द्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली.






