पुणे जिल्हा | विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप

बारामती, (प्रतिनिधी)- विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून शरयू फाउंडेशनच्या वतीने आणि पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने बारामती तालुक्यातील शालेय विद्यार्थींनींना दीड हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. बारामती येथे मुक्ताई लॉन्समध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, जयश्री सातव, पौर्णिमा तावरे, राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष संदीप गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा वनिता बनकर, महिला शहराध्यक्षा आरती गव्हाळे, युवती तालुकाध्यक्षा प्रियांका शेंडकर,
युवती शहराध्यक्ष प्रियांका खारतोडे, तालुका युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर, शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, तालुका युवक कार्याध्यक्ष गौरव जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, कर्मचारी, पालक व नागरिक उपस्थित होते.
घरापासून शाळा दूर आहे आणि शाळेत जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही म्हणून ग्रामीण भागातील कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये, या उदात्त भावनेतून हा मोफत सायकल वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.
यापूर्वीही सुळे यांच्या पुढाकारातून ‘टु व्हिल्स ऑफ होप’ उपक्रमांतर्गत आजवर २६ हजार सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाला गती मिळाली आहे. यापुढेही उपक्रम घेणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी यावेळी जाहीर केले.





