शिरूर तालुक्यातील ३३१ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

शिरूर – ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने “सायकलचा आधार, भविष्याला आकार” हा उपक्रम राबविला आहे. शिरूर तालुक्यात या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, ३३१ गरजू मुलींना सायकली भेट देण्यात आल्या.
शिरूर तालुक्यातील अनेक मुलींना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास पायी करावा लागतो. अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने गावागावांतील दानशूर व्यक्तींना सायकल दान करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक संघटना, अधिकारी, कर्मचारी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या सामूहिक सहभागातून ३३१ सायकली जमा झाल्या आणि विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या.
गावनिहाय सायकल वाटप :
गोलेगाव-१०, करंजावणे-३, पिंपळे खालसा-१०, सोनेसांगवी-२, शिरूर ग्रामीण-२, न्हावरा-१, बाभुळकर बु.-६, कर्डे-३, वरुडे-१, जातेगाव बु.-२, आन्नापूर-१८, शिरसगाव काटा-४, निमोणे-२४, काठापूर खुर्द-५, धानोरे-१, रांजणगाव सांडस-७, रांजणगाव गणपती-२, दहिवडी-१, तर्डोबाची वाडी-६, सरदवाडी-२, खैरेवाडी-६, केंदूर-३, पारोडी-१५, सविंदणे-४, कोंढापुरी-४, तळेगाव-१८, मलठण-१६, कवठे येमाई-२, पाबळ-१, निमगाव म्हाळुंगी-२.
गटविकास अधिकारी महेश डोके म्हणाले, “सायकलमुळे मुलींचा शैक्षणिक प्रवास सुलभ होईल आणि त्यांचे जीवनमान बदलू शकेल. समाजाच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला.” या उपक्रमामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. सायकलींमुळे वेळेची बचत होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे. दानशूर व्यक्तींच्या योगदानाने सामाजिक संवेदनशीलता आणि शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित झाली.





