नागपुरात आयुक्तांविरोधातील वाद चिघळला!

नागपूर – नागपूरमधील आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यात करोनामुळे तीन महिन्यांनंतर झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक हे आयुक्तांविरोधात एकत्र झाल्याने जोरदार गोंधळ उडाला. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट सभात्याग करत काढता पाय घेतला.
सभागृहात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्द्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुकाराम मुंढे बोलणं थांबवत नाहीत हे बघून भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असे मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितले. यानंतर तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा, असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर तुकाराम मुंढे नाराज झाले. त्यातच संत तुकारामांच्या नावावरून तुमचे नाव आहे, त्याला तरी कलंकित करू नका, असे नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यानंतर तुकाराम मुंढे हे सभागृहातून बाहेर पडले.





