“महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करा..”

मुंबई – शिवसेनेचे माजी नगरसेवक घोसाळकरांची हत्या आणि भाजप आमदाराचा पोलिस ठाण्यातील गोळीबार या सारख्या घटनांमुळे महाराष्ट्रात गंभीर कायदा आणि सुव्यवस्था स्थिती निर्माण झाली असून या स्थितीला जबाबदार असलेल्या राज्यातील एकनाथ शिंदे सरकारची त्वरीत बरखास्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि आमदार पोलिसांना धमकावत असल्याचा आरोप केला. राऊत यांनी गृहखाते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात नुकतेच झालेले प्रकार हे गृहमंत्र्यांचे (फडणवीस) अपयश दर्शवते. हे सरकार आमच्यावर लादण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना बडतर्फ करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, असे आव्हान राऊत यांनी केंद्राला दिले. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचा दावा त्यांनी केला.
आमच्याकडे ठाणे आणि मुंबईत तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची यादी आहे. ते सर्व शिंदे सेनेचे सदस्य आहेत. २०२४च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असा इशारा राऊत यांनी दिला.





