बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करण्यात यावे आणि त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात संशयास्पद भूमिका बजावणाऱ्या वाशी पोलिस स्टेशनच्या पोलिसांचे सीडीआर तपासण्यात यावे, अशीही मागणी धस यांनी केली आहे. मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट देत माध्यमांशी संवाद साधला. धस म्हणाले, महादेव मुंडेचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा हाच महाजन त्यावेळी तिथे होता. हाच महाजन जालना येथे देखील एका केसमध्ये सस्पेंड झाला आहे. महाजन हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याचे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांसोबत उठबस आहे. राजेश पाटील देखील तसाच आहे. जर आमच्या संतोष अण्णांचा मृतदेह केजकडे आणायच्या ऐवजी कळंबकडे नेत असेल तर तो कोणाच्या बाजूचा माणूस आहे हे समजते. त्यामुळे हे दोघेही सस्पेंड व्हावे आणि सहआरोपी व्हावेत. धस पुढे म्हणाले, गेले दोन दिवस जो त्रागा, जो त्रास सहन करावा लागला आहे. येथील ग्रामस्थांना व देशमुख कुटुंबीयांना ते मी समजू शकतो आणि मान्य करतो. परंतु मी एक गोष्ट सांगू इच्छितो ग्रामस्थांना की राज्याचे मुख्यमंत्री संतोष देशमुख हत्या प्रकरणात इमानदारीने तपास करत आहेत. हे क्लेशकारक जे आंदोलन तुम्ही केले आहे, ते पुन्हा करण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असे आश्वासन सुरेश धस यांनी दिले आहे.