अहमदाबाद – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी धवल पटेल यांनी गुजरातमधील विदारक शैक्षणिक स्थिती समोर आणली. त्याची गंभीर दखल घेऊन गुजरातच्या शिक्षण विभागाने अहवाल मागवला आहे. गुजरात सरकारने शाळा प्रवेशोत्सव मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत सरकारी प्राथमिक शाळांमधील शैक्षणिक स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यमापन केले जात आहे. त्या मोहिमेची जिल्हानिहाय जबाबदारी विविध आयएएस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. पटेल यांनी छोटा उदेपूर जिल्ह्यात आढावा घेतला. त्यातून त्यांनी संबंधित आदिवासीबहुल जिल्ह्यातील शैक्षणिक स्थितीविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. तसे पत्र त्यांनी राज्याच्या शिक्षण सचिवांना पाठवले. मी भेट दिलेल्या सहापैकी पाच शाळांतील शिक्षणाचा दर्जा अतिशय खालच्या स्तराचा वाटला. तेथील विद्यार्थी साधे-साधे शब्दही वाचू शकत नाहीत. तसेच, गणिताची साधी समीकरणे सोडवू शकत नाहीत. आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण काळाबरोबर जाणारे नाही. तशा प्रकारचे शिक्षण केवळ आदिवासींच्या पुढील पिढ्या मजूर म्हणून काम करतील, अशी निश्चिती करतील. तशा शिक्षणाने आदिवासी कधीच प्रगती करू शकणार नाहीत, अशी परखड भूमिका पत्रातून मांडण्यात आली.