Disha Salian Case : वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियनची आत्महत्या; पोलिसांच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

Disha Salian Case News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालवण पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाने आत्महत्याच केल्याचे समोर आले आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे दिशा इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबाबत मित्रांनाही सांगितल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय?
प्रोजेक्टमध्ये झालेले नुकसान आणि वडिलांच्या अफेअरमुळे त्यांना वारंवार पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे दिशा तणावात होती. दिशाने याबाबत मित्रांना सांगितले होते. दिशाच्या मैत्रिणींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत, त्यामधून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ४ जून २०२१ रोजी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट दिशाच्या वडिलांना दाखवला होता, अशी माहिती देखील मिळत आहे. जुन्या क्लोजर रिपोर्टमुळे दिशाच्या मृत्यूला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. (Disha Salian suicide)
दिशाचा प्रियकर रोहन राय, तिचे मित्र, आई वडिलांचे नोंदवल्यानंतर मालवण पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार केला होता. मालवण पोलिसांनी तयार केलेले क्लोजर रिपोर्ट दाखल झाल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये राज्य सराकरने एसआयटी बनवून तपास सुरू केला. सरकार बदलल्यानंतर महायुतीच्या सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीचा रिपोर्ट मात्र वर्षाभराहून अधिक काळ प्रतीक्षेत आहे. आता एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोर्ट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Disha Salian Case)
दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच मृत्यू
दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होते, असे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियनच्या वडिलांची हायकोर्टात धाव
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी याचिकेतून केला आहे. या याचिकेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यसह मुंबई पोलिसांवर देखील या याचिकेतून आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याची सुनावणी होणार आहे. (Disha Salian Case)





