Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI कडे; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टचं सांगितलं
Aditya Thackeray : न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

Aditya Thackeray : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गुरुवारी पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी मोजक्याच शब्दांत उत्तर दिले.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले, “या साऱ्याचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. माझं याच्याशी काही देणं-घेणं नसताना मी यावर प्रतिक्रिया का नोंदवावी?” यावेळी पत्रकारांनी भाजपाकडून काही आरोप करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.
“भाजपा प्रत्येकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते. त्यांनी राहुल गांधींना मागील एवढ्या वर्षांपासून ‘पप्पू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. ते मागील सहा वर्षांपासून माझी बदनामी करत आहेत. जो कोणी भाजपाविरुद्ध बोलतो, त्याला ते लक्ष्य करतात,” असे ते म्हणाले.
भाजपाविरुद्ध बोलल्यामुळे किंवा त्यांच्याविरोधात आवाज उठवल्यामुळेच हे घडले आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “मी आधी म्हणालो त्याप्रमाणे माझं या साऱ्याशी काही देणं-घेणं नाही, तर मी याबद्दल का बोलावं?” असा सवाल त्यांनी केला.
न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवताना मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून एफआयआर दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपासासाठी अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच मालवणी पोलिस ठाण्याने प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तात्काळ CBIकडे सोपवावीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, तपासात पुरेसे पुरावे नसल्यास कोणालाही आरोपी ठरवू नये किंवा तशी वागणूक देऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई पोलिसांचा युक्तिवाद काय?
या प्रकरणात आपली बाजू मांडताना मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण झाला असून, दिशा सालियन यांचा मृत्यू अपघाती असल्याचे आढळल्याचे सांगितले. पाच वर्षांनंतर पुन्हा तपास केला तरी हाच निष्कर्ष निघाल्याचा दावा पोलिसांनी केला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान राजकीय सूडबुद्धीने त्यांचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याचा आरोप केला.
८ जून २०२० रोजी झाला होता मृत्यू
दिशा सालियन यांचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला होता. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंदवून तपासले होते. मात्र, या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला नव्हता.
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नव्याने तपास करण्याची आणि CBI चौकशीची मागणी केली होती. आता न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे CBIच्या तपासात पुढे कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Varun Dhawan: हातात कुदळ अन् अंगाला चिखल! वरुण धवन थेट शेतात उतरला; म्हणाला, “शेतीला सुरुवात…”




