दिशा सालियन प्रकरण! आदित्य ठाकरे ड्रग्जच्या व्यवसायात, उद्धव ठाकरेही आरोपी; वकील निलेश ओझांचे खळबळजनक आरोप

मुंबई: दिशा सालियनच्या (Disha Salian) मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघात नसून तिच्यावर बलात्कार करून हत्या झाल्याचा गंभीर आरोप तिचे वडील सतिश सालियन यांनी केला असून, या प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर, सतिश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आज मुंबईतील पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ओझा यांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.
निलेश ओझा यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता दिनो मोरिया, सूरज पांचोली आणि माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप लावले. ओझा म्हणाले, “नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) तपासातून समोर आलं आहे की, आदित्य ठाकरे ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहेत. यासंदर्भातील सर्व पुरावे आम्ही अर्जात सादर केले आहेत. आदित्य ठाकरे आणि दिनो मोरियाच्या फोन कॉल्समधून हे उघड झालं आहे. समीर खान नावाच्या व्यक्तीच्या ‘डीएफआय’ नावाच्या कंपनीद्वारे ड्रग्जचं सिंडिकेट चालवलं जात होतं.”
आदित्य ठाकरेंचं नाव ड्रग्ज व्यवसायात आल्यानंतरही समीर वानखेडेसह NCB च्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यापासून कोणी रोखलं, असा थेट सवाल ओझा यांनी उपस्थित केला. “यामागे किती कोटींची डील झाली?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.
#WATCH | Disha Salian Murder case | Mumbai: Disha Salian’s father Satish Salian’s advocate, Nilesh Ojha says, “We met the Joint CP, we told him that as per the Bombay High Court guidelines, a written complaint should be considered as an FIR, he has accepted it. In this complaint,… pic.twitter.com/oHhDZDlgoT
— ANI (@ANI) March 25, 2025
सतिश सालियन यांचं निवेदन आधीच नोंदवलं –
सतिश सालियन यांचं निवेदन 11 डिसेंबर 2023 रोजी नोंदवलं गेलं असून, त्यांनी या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली आहे. “आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही आहेत. दिशाची हत्या झाली त्या दिवशी आदित्य ठाकरे तिथे होते की नाही? दिशाचा मृत्यू नैसर्गिक नाही, हे आरोपींनी सिद्ध करावं,” असं ओझा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
स्टीव्ह पिंटोच्या पोस्टवरून संशय –
दिशाचा मित्र स्टीव्ह पिंटो याने 7 जून 2020 रोजी एकता कपूरच्या घरी झालेल्या पार्टीचा उल्लेख ट्विटरवर केला होता. या पोस्टमध्ये त्याने महत्त्वाच्या हिंट्स दिल्या होत्या. “पण त्या दिवसापासून स्टीव्ह पिंटो बेपत्ता आहे,” असं ओझा यांनी नमूद केलं. त्यांनी पुढे असंही आव्हान दिलं की, “आमची तक्रार खोटी ठरली तर आम्हाला फाशी द्या, हे आम्ही तक्रारीत लिहिलं आहे.”
या प्रकरणाने पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूभोवतीचं गूढ वाढवलं असून, ठाकरे कुटुंबावर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




