Khushboo Patani: दिशा पाटनीची बहीण आंदोलनात उतरली; जंतर-मंतरवरील परिस्थितीबाबत केला मोठा खुलासा
Khushboo Patani खुशबू पाटनीने या आंदोलनात स्वतः सहभागी होत चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर कॅप घालून विद्यार्थ्यांमध्ये मिसळून परिस्थिती जवळून अनुभवली. तिने सांगितले की, आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही महिलांना कुठेही असुरक्षित वाटले नाही. उलट आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी महिलांची विशेष काळजी घेतली.

Khushboo Patani: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपर लीक प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनात अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी देखील सहभागी झाली होती. आंदोलनानंतर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तेथील परिस्थिती, पोलिसांच्या कारवाईचा अनुभव आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या वागणुकीबद्दल सविस्तर माहिती दिली.
देशातील NEET पेपर लीक प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आणि अश्रुधूराचा वापर केल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
खुशबू पाटनीने या आंदोलनात स्वतः सहभागी होत चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर कॅप घालून विद्यार्थ्यांमध्ये मिसळून परिस्थिती जवळून अनुभवली. तिने सांगितले की, आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही महिलांना कुठेही असुरक्षित वाटले नाही. उलट आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांनी महिलांची विशेष काळजी घेतली.
तिच्या मते, अनेक तरुण गर्दीत महिलांना धक्का लागू नये म्हणून दोन्ही हात वर करून चालत होते. काहीजण महिलांना पाणी देत होते, त्यांची विचारपूस करत होते आणि सुरक्षिततेची काळजी घेत होते. महिलांबद्दल इतका आदर आणि संवेदनशीलता तिने यापूर्वी फार कमी ठिकाणी पाहिल्याचेही खुशबूने सांगितले.
खुशबूने ‘जनरेशन झेड’च्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. ती म्हणाली की, आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश विद्यार्थी उच्चशिक्षित असून त्यांच्यात एकजूट आणि शिस्त दिसून आली. या नव्या पिढीने दाखवलेली जबाबदारी आणि परस्परांची काळजी घेण्याची वृत्ती पाहून ती प्रभावित झाली. याआधी ती महिलांना नेहमीच पाठिंबा देत होती, पण आता नव्या पिढीतील तरुण मुलांबद्दलही तिच्या मनात आदर निर्माण झाल्याचे तिने सांगितले.
पोलिसांच्या कारवाईबाबत बोलताना खुशबूने सांगितले की, आंदोलनात लाखो विद्यार्थी उपस्थित होते, तर मोठ्या संख्येने पोलीसही तैनात होते. लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यावर मारहाण होत असल्याचे दिसले की इतर आंदोलक त्याला वाचवण्यासाठी धावत होते. विद्यार्थ्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला होता. लाठीचार्ज सहन करूनही त्यांनी पोलिसांवर हात उचलला नाही किंवा हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला नाही, असे तिचे म्हणणे आहे.
तिने पुढे दावा केला की, अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आणि पायांवर लाठ्या मारण्यात आल्या. मुलींनाही मारहाण झाली. स्वतःलाही धावत असताना किरकोळ मार बसल्याचे खुशबूने सांगितले. अचानक परिस्थिती बदलल्यानंतर अनेक आंदोलकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी धावपळ केली, असेही तिने आपल्या अनुभवातून सांगितले.
खुशबू पाटनीने शेअर केलेल्या या अनुभवाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. काहींनी तिच्या धाडसाचे कौतुक केले, तर काहींनी आंदोलन आणि पोलिस कारवाईबाबत वेगवेगळी मते व्यक्त केली. दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि त्यावरील कारवाई हा विषय सध्या देशभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.





