पुणे – राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असलेल्या दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील अनंत रानडे व गजानन जोशी या दोघा कार्यकर्त्यांना जाहीर झाला आहे. रोख 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ‘दिशा परिवार’ या संस्थेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी पुरस्काराची माहिती दिली. गरजू विद्यार्थ्यांना दात्यांच्याच हस्ते आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने “दिशा परिवार’ला कार्यकर्त्यांची शृंखला तयार व्हावी, यासाठी गतवर्षीपासून आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येत आहे. पुरस्काराचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. अनंत रानडे हे 1890 साली स्थापन झालेल्या राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत, तर गजानन जोशी हे राजापूर बसस्थानक डेपोमध्ये मुख्य मेकॅनिक या पदावर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दात्यांच्याच हस्ते प्रदान केली जाते. दिशा परिवारला राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांची निवड करून, येथून अनेक दाते मिळवून देण्यात रानडे व जोशी यांनी मोठे कार्य केले आहे. होतकरू मुलांना आर्थिक मदत मिळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने कार्य करत आहेत. एवढेच नव्हे, तर संस्थेला दरवर्षी मदत करून या दोघांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागदर्शनाचे त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. त्यांची मुलांप्रती धडपत पाहून याची दखल संस्थेने घेतली आणि त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, असेही राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले. हा पुरस्कार सोहळा येत्या रविवारी, दि. 27 ऑगस्ट रोजी पुण्यात होत आहे.