चर्चेत : सायबर दहशतवादाचे आव्हान

ऍड. प्रदीप उमाप
गेल्या वीस वर्षांपासून दहशतवादाचे रूप बदलत आहे. पूर्वी दहशतवादी अचानक येऊन हल्ला करून तितक्याच वेगाने निघून जायचे. पण आता दहशतवादी इंटरनेटचा वापर करत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या वेबसाइट्सवर हल्ला करून त्या निकामी करतात.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन जागतिक युद्धे झाल्यानंतर युद्धाच्या विध्वंसकतेचा जगाने दारुण अनुभव घेतला. 1950च्या दशकानंतर प्रत्यक्ष युद्धे संपली; पण दहशतवादाच्या रूपाने अप्रत्यक्ष युद्धे सुरूच राहिली आणि त्यातही प्रचंड जीवितहानी झाली, अजूनही होत आहे.
शत्रू राष्ट्रातील असंतुष्ट घटकांना फूस लावून त्यांच्याकडून हिंसक कारवाया करवून घेणे किंवा या असंतुष्ट घटकांनी आपणहून अशा हिंसक कारवाया करणे म्हणजे दहशतवाद, असे ढोबळ मानाने म्हणता येईल. कारण दहशतवाद म्हणजे नेमके काय हे अजून संयुक्त राष्ट्रांनाही ठरवता आलेले नाही.
दहशतवादाचे स्वरूप संघटित नसते. म्हणजे दहशतवादी संघटना असतात पण त्या आपापल्या कारवाया स्वतंत्रपणे करत असतात आणि कदाचित त्यामुळेच त्यांच्याविरोधात जगातील देशांना एकत्रित होता येत नाही. शिवाय जे लोक एखाद्या देशात दहशतवादी असतात ते दुसऱ्या देशात अन्यायाविरोधात लढणारे मसीहा असतात.
त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा प्रत्येक देशाचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणूनच दोन देशांतील युद्धात जसे इतर देश भूमिका घेतात किंवा घेऊ शकतात. पण दहशतवादी कारवायांबाबत अशी भूमिका कोणत्याच देशाला घेता येत नाही. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट युद्ध झाले तर या दोन देशांच्या बाजूने जगातील अनेक देश उभे राहतील.
पण पाकिस्तानप्रणीत दहशतवादी कारवाया भारतात होतात त्याविरोधात कुणी भूमिका घेऊ शकत नाहीत. कारण या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचा छुपा पाठिंबा असतो. प्रत्यक्षात या कारवाया दहशतवादी संघटना घडवून आणत असतात. अर्थात, पाकिस्तानचा खरा चेहरा आता उघड झाल्यामुळे अमेरिकेसारख्या दोस्तानेही पाकिस्तानला मदत करताना आता हात आखडता घेतला आहे.
पण आता दहशतवादाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. इंटरनेटचा प्रसार संपूर्ण जगभरात झपाट्याने होत आहे, तसा इंटरनेटचा वापर करून गुन्हेगारी करण्याची प्रवृत्तीही झपाट्याने वाढत आहे. दहशतवादी संघटनाही आता सायबर दहशतवाद पसरवू लागल्या आहेत.
आता दोन देशांमध्ये प्रत्यक्ष नाही तर सायबरयुद्ध सुरू असते. शत्रू राष्ट्राच्या अतिमहत्त्वाच्या वेबसाइट्स हॅक करून त्याची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती नष्ट करणे किंवा चोरणे, त्याचबरोबर विज्ञान-तंत्रज्ञानविषयक संशोधन किंवा माहिती विद्रुप करणे किंवा त्यात बिघाड करणे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवादात येतात.
भारताचा विचार केला तर सायबर दहशतवादाचा धोका आपल्या देशाला आहेच. पण त्याकडे म्हणावे तसे अजून लक्ष दिले गेलेले नाही. अमेरिका आणि चीननंतर इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात होतो. इंटरनेटवर पूर्णत: अवलंबून असणाऱ्यांची मोठी संख्या भारतात आहे आणि हे अवलंबित्वच आपल्या असुरक्षिततेचे मोठे कारण बनले आहे.
इंटरनेटचा वापर करताना सर्वसामान्य लोक फारसे जागरूक नसतात. त्यामुळे इंटरनेट किंवा सायबर धोक्यांविषयी ते अनभिज्ञ असतात आणि म्हणूनच सहज फसू शकतात. इंटरनेटवर, सोशल मीडियावर आपण आपली अशी माहिती सहज टाकतो जी वास्तविक कुणाला माहीत असता कामा नये. आपल्याला वाटते आपण वापरत असलेली वेबसाइट किंवा सोशल मीडिया सुरक्षित आहे, पण तसे असतेच असे नाही. आपण अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात आपसूकच फसले जातो.
इंटरनेटचा वाढता वापर ही सायबर दहशतवादासाठी सुपीक जमीन आहे, असे म्हणायला हरकत नाही. लोकांच्या मनावर परिणाम करून त्यांच्याकडून विशिष्ट कृती करवून घेतली जाते, व्यक्ती आणि समाजासाठी हे घातक असते. आपल्या देशात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या सायबर दहशतवादाची उदाहरणे अनुभवायला मिळत आहेत.
सायबर दहशतवादामुळे केवळ राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे असे मानले जाते. पण हा दहशतवाद समाजालाही वेठीला धरू शकतो. सायबर दहशतवादापासून देशातील अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले अणुप्रकल्प, इस्रो यासारखे प्रकल्प सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सायबरतज्ज्ञ प्रयत्न करत आहेत.
सायबर दहशतवादी सोशल मीडियावर जास्त सक्रिय असलेले दिसून येतात. यावर तरुणांची संख्या जास्त असते. त्यामुळे हे तरुण या दहशतवाद्यांचे सहज लक्ष्य असतात. त्यांच्याशी या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधायचा आणि त्यांच्यावर दबाव आणणे, धमकावणे, ब्लॅकमेल करणे अशा प्रकारे मानसिकदृष्ट्या अत्याचार केले जातात. लोकांना लॉटरीचे वगैरे आमिष दाखवून फसवले जाते. महिलांना जाळ्यात ओढले जाते. सायबर दहशतवाद नुसता चोरी आणि फसवेगिरी एवढ्यापुरताच मर्यादित नाही.
हा दहशतवाद संपूर्ण जगाची सुरक्षा धोक्यात आणू शकतो आणि हे एखादा माथेफिरू सायबर गुन्हेगार करू शकतो. म्हणूनच हा दहशतवाद अधिक भयानक आहे. यातील दहशतवादी चेहरा लपवून, ओळख लपवून काहीही करू शकतो. सायबर दहशतवादावर मात करण्यासाठी सायबर तज्ज्ञांचे आणि सायबर पोलिसांचे कौशल्य पणाला लागते. अर्थात, सर्वसामान्य लोकांनीही इंटरनेट आणि सोशल मीडिया हाताळताना सावधगिरी बाळगणे, त्याबाबत सजग आणि सावध असणेही तितकेच गरजेचे आहे.
पहिला सायबर दहशतवादी 1996 मध्ये पकडला गेला होता. व्हाइट सुपरमासिस्ट मूव्हमेंट नावाच्या चळवळीचा तो सदस्य होता. अमेरिकेतील इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सची सेवा त्याने ठप्प केली होती. त्याने अनेक वेबसाइट हॅक करून त्यावर वर्णद्वेषी घोषणा आणि टिप्पण्या पोस्ट केल्या होत्या. हा इतिहासातील पहिला सायबर हल्ला.
यातूनच पुढे याहीपेक्षा मोठे आणि भयानक सायबर हल्ले होऊ शकतात हे समजून आले. सायबर दहशतवाद हे आता वास्तव बनले आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याच देशाच्या सरकारला परवडणारे नाही. दहशतवादातून केवळ अराजकता माजवण्याचा प्रयत्न असतो आणि अस्थिरताही. आता ई-बॉम्ब ही संकल्पनाही सायबर दहशतवादाबरोबर रूजू लागली आहे.
ई-बॉम्ब म्हणजे खरा दहशतवाद आहे की केवळ हॅकींग आहे यावर तज्ज्ञांचे एकमत नाही. पण दहशतवादी आता सायबर सॅव्ही बनत चालले आहेत. आता दहशतवादाचा सामना प्रत्यक्ष आणि सायबर अशा दोन्ही आघाड्यांवर करावा लागणार आहे.





