कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

कोयनानगर -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली असून, पाणीसाठ्याने अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून विसर्ग सुरू केला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून नदीत 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणात सध्या 53.69 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासांत धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 150 मिमी, नवजा येथे 202 मिमी, तर महाबळेश्वर येथे 185 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात 59 हजार 977 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ दहा टीएमसी असलेला पाणीसाठा आता 53.69 टीएमसी झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता अधिक असली, तरी आतापासूनच धरणातील जलपातळी नियंत्रित करण्यात येत आहे. पायथा वीजगृहातून सोमवारी दुपारी 4 पासून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले. धरणाची जलपातळी 2111.05 फूट झाली आहे.




