पुणे | खडकवासला धरणातून विसर्ग बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला धरण परिसरात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून सुरु असलेला विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला. दरम्यान खडकवासला धरणातून मागील 24 तासात सुमारे अडीच टीएमसी इतके पाणी नदीत सोडण्यात आले. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा 77.60 टक्के म्हणजे 22.62 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत,वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. 12 तासात खडकवासला धरणात 74 मिमी, पानशेतमध्ये 129 मिमी, वरसगावमध्ये 132 मिमी आणि टेमघरमध्ये 170 मिमी इतका पाऊस झाला.
त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा जमा झाला. फक्त खडकवासला धरण भरले असल्याने येणारे पाणी तातडीने सोडण्यात येत होते. मात्र पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही तीन धरणे अद्यापही 100 टक्के भरली नाही. मात्र पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र शुक्रवारी दिवसभरात धरण परिसरात अल्पसा पाऊस झाला.
खडकवासला धरणात मात्र पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्याचे दिसून आले. पानशेत धरणात 26 मिमी, वरसगावमध्ये 28 मिमी आणि टेमघर धरणात 20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सकाळी खडकवासला धरणातून 13 हजार 981 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारा पाण्याचा येवा कमी झाला. त्यामुळे टप्पाटप्पाने विसर्ग कमी करण्यात आला. 4 हजार 708 क्युसेकने सोडण्यात येत असलेला विसर्ग पाच वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आला.
खडकवासला – 1.03 टीएमसी – 51.59 टक्के
पानशेत – 9.28 टीएमसी – 87.18 टक्के
वरसगाव – 9.63 टीएमसी – 75.09 टक्के
टेमघर – 2.68 टीएमसी – 72.41 टक्के





