Pimpri : उद्योगनगरीच्या पदरी पुन्हा निराशा

पिंपरी : उद्योगनगरी म्हणून देशभरात प्रचलित असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पदरी मंत्रीपदाबाबत पुन्हा एकदा निराशा आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगनगरीला मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
सलग तीनदा निवडून आलेले आमदार महेश लांडगे असो वा विक्रमी मताधिक्याने जिंकलेले शंकर जगताप असो किंवा तिसऱ्यांदा जिंकणारे आमदार अण्णा बनसोडे असो कुणालाही भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने मंत्रीपदाची संधी दिली नाही. भाजपसह राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे शहराला मंत्रीपद तरी कधी मिळणार? असा सवाल पिंपरी चिंचवडकर करु लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघातून विजयाची हॅट्रीक करणारे आमदार महेश लांडगे ये मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार समजले जात होते. भाजपचा प्रबळ हिंदुत्ववादी चेहरा अशी आमदार लांडगे यांची ओळख आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध हा त्यांच्या पूरक गुणामुळे त्यांना मंत्री पद मिळावे, अशी अनेकांची अपेक्षा होती. भोसरी विधानसभा मतदारसंघात हिंदुत्त्वासोबतच विकासाचे नवे माॅडेल उभे करणारे लांडगे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांचे भावी मंत्री असे फलक मतदारसंघात झळकले होते. मात्र, त्यांना भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद मिळविण्यात यश आले नाही.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे हे यंदा पिंपरी विधानसभा मतदार संघाचे तिसर्यांदा प्रतिनिधित्व करीत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. अजित पवार यांच्या राजकीय बंडाच्यावेळी बनसोडे हे अजित पवार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे तीन वेळा निवडून येण्याबरोबरच अजित पवार यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागू शकली नाही.
सध्या शहरातील विधानसभा सदस्यांची संख्या 3 तर विधानपरिषद सदस्यांची संख्या 2 असे एकूण पाच आमदार शहरात वास्तव्यास आहेत. यापैकी अमित गोरखे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले गोरखे यांना मंत्रीपद देण्याची मागणी समाज बांधवांनी केली होती. मात्र त्याला यश आले नाही.
शहराची बोळवण
काँग्रेस नेते स्व. प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शालेय शिक्षणमंत्रीपद भूषविल्यानंतर अद्यापपर्यंत एकाही आमदाराला मंत्रीपद मिळू शकले नाही. मात्र. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेली अनेक पदे शहरातील विशेषत: भाजप पदाधिकार्यांना मिळाली आहे. यामध्ये लेखा समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद अशी अनेक पदे मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाबरोबरच ग्राहक समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. परंतु मंत्रीपद न देता शहराची बोळवण करण्यात येत असल्याची भावना पिंपरी-चिंचवडकर सातत्याने व्यक्त करत आहेत.
भाजपला भरभरुन दिले पण…
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी २०१४ पासून आजवर झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजपला भरभरुन मतदान केले आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी कधीच महायुतीला नाराज केले नाही. चिंचवड आणि भोसरी हे दोन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आजवर कधीच भाजपशिवाय इतर कोणत्याही पक्षाला विजय मिळविता आला नाही. एवढा विश्वास नागरिकांनी भाजपवर टाकला होता. २०१७ साली पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिका निवडणुकीतही भाजपला प्रचंड बहुमत देत महापालिकेची सत्ता पहिल्यांदा भाजपच्या हाती दिली होती. मावळ लोकसभा मतदारसंघातून देखील सातत्याने महायुतीचा खासदार निवडून देण्यात पिंपरी-चिंचवडकरांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. २०२४ साली राज्यात सर्वत्र महायुतीची पीछेहाट होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा खासदार व्हावा, याकरिता पिंपरी आणि चिंचवडच्या मतदारांनी प्रचंड मतदान करत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला. परंतु दरवेळी प्रमाणे यंदाही शहराच्या पदरी निराशाच आली.





