औरंगजेबाच्या कबरीवरून शिंदे गटामध्ये मतभेद; ‘या’ दोन नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई : राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला औरंगजेबाच्या कबरीचा वाद शमल्याचे दिसत नाही. कबरीच्या मुद्यावरून राजकारण सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात यावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी परस्पर वक्तव्ये केली आहेत. औरंगजेबाची कबर तिथे नको, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली आहे. तर कबर तिथेच राहु द्या, पण तिचे उदात्तीकरण व्हायला नको, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदे गटात महाभारत सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
संजय शिरसाट म्हणाले, ज्या वाईट खुना असतात, त्या दूर केल्या पाहिजेत. त्यामुळे भैय्युजी महाराजांनी जरी स्टेटमेंट केले असेल, अनावश्यक वाटत असेल, परंतु हा आमच्या छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्राच्या स्वाभीमानाचा विषय आहे. आम्हाला त्या वाईट आठवणीला उजाळा द्यायची आवश्यकता वाटत नाही. म्हणून आम्ही घेतलेली ही भूमिका आहे. संघाच्या भूमिका काही असू शकतात. त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करत नाही. संघाची भूमिका काही असली, तरी आमची भूमिका कबर नको अशी ठाम आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
तर दुसरीकडे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे कि, औरंगजेबाची कबर जिथे आहे, तिथेच राहु द्या. परंतु, त्याचे उदात्तीकरण व्हायला नको. त्याला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊ नये. त्या ठिकाणी कोणते मोठे बांधकाम होता कामा नये. राज ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे तिथे लिहिले पाहिजे, जो महाराष्ट्र स्वराज्य संपवायला आला होता, तो स्वतः या मातीत गाडला गेला. पण तो स्वराज्याला हात लावू शकला नाही. असा मोठा बोर्ड लावण्यात यावा. औरंगजेबाचा अंत कसा झाला, हे पुढील पिढ्यांना समजले पाहिजे. यासाठी राज ठाकरे जे म्हणाले ते योग्य आहे, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
भैय्याजी जोशी यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू भारतातच झाला, त्यामुळे त्याची कबर इथेच बांधण्यात आली. ज्याला त्याच्याबद्दल प्रेम असेल तो तेथे जाईल. पण हा काही चर्चेचा मुद्दा असू शकत नाही. त्यापेक्षा आपल्याकडे शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. ज्यांनी अफजल खानाची कबर बांधली होती. ही भारताची उदार आणि सर्वसमावेशक मानसिकता आहे, असे भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.
मराठ्यांनी कोणाला मारला हे जगाला कळू दे : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी रविवारी औरंगजेबाच्या मुद्द्यावरून धार्मिक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच अशा प्रयत्नांवर टीका केली. इतिहास हा कोणत्याही जाती-धर्माच्या चष्म्यातून पाहिला जाता कामा नये. मोगल बादशाह हे शिवाजी या विचाराला मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले. मात्र, यात तो अपयशी ठरला आणि शेवटी महाराष्ट्रातच त्याचा मृत्यू झाला.जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. मात्र ज्यावेळी त्याचा अभ्यास केला जातो, त्यावेळी शिवाजी महाराजांचे नाव येते. मराठ्यांनी कोणाला मारला हे जगाला कळू दे, यासाठी त्याला पायथ्याशी पुरला, असे राज ठाकरे म्हणाले.





