आरोग्य यंत्रणेतील विसंवादाचा फटका औषध फवारणीला

सातारकरांचे आरोग्य धोक्यात; लिपिकाची अनुपस्थिती भोवली आरोग्य निरीक्षकाला
सातारा -पदरचनेचे राजकारण सातारा शहरातील औषध फवारणीच्या मुळावर आल्याचे विदारक दर्शन स्थायी समितीच्या सभेत घडले. आरोग्य विभागाचे कारभारी शैलेश अष्टेकर गैरहजर राहिल्याने नव्याने हजर झालेले आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना नगरसेवकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. आरोग्य यंत्रणेतील विसंवादाचा फटका शहराच्या औषध फवारणीला बसल्याने सातारकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील 39 वॉर्डांसह हद्दवाढ झालेल्या वाढीव क्षेत्रातही करोनाच्या पाश्वभूमीवर औषध फवारणी अतिआवश्यक बनली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून औषध फवारणी झालीच नसल्याचे धक्कादायक वास्तव असून जंतुनाशक औषध खरेदीचे आकडे मात्र कोट्यवधीच्या घरात आहेत. फवारणी पंपाचा नोझल वारंवार नादुरुस्त होत असल्याची तक्रार केली जात आहे.
करोनाच्या एप्रिल व मे महिन्याच्या लाटेत पालिकेने शहराच्या प्रत्येक वॉर्डात औषध फवारणीची मोहिम हाती घेतली होती.
मात्र, या फवारणी मोहिमेला बोळा लावण्यात आला. आधी सुहास पवार यांची आरोग्यमधून बदली नंतर शैलेश अष्टेकरांची हजेरी या दोन लिपिक कारभाऱ्यांच्या सावळ्या गोंधळात राज्य संवर्गाचे प्राप्त अंर्हताधारक प्रकाश राठोड यांचा पदभार मधल्या मध्ये लटकला आहे. नव्हे तो राजकीयदृष्टया लटकविण्यात आला आहे. अष्टेकर यांची आरोग्यपूर्ण कामगिरी कितीही सरस असली तरी आरोग्य निरीक्षक हे तांत्रिक पद असल्याने तिथे राठोड यांनाच चार्ज मिळणे गरजेचे आहे. याची स्पष्ट कल्पना मुख्याधिकारी अभिजित बापट यांना असताना सर्व प्रशासकीय निर्णय राजकीय वळचणीला जात असल्याचे चित्र आहे.
स्थायी समितीच्या सभेत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांमधील विसंवादाचा फटका औषध फवारणी मोहिमेला बसला. गेले आठ दिवस अष्टेकर गैरहजर असून त्याची कोणतीही कल्पना आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांना नाही. अष्टेकर यांची अनुपस्थिती राठोड यांना चांगलीच अडचणीची ठरली.
स्थायी समितीच्या सभेत तुम्ही कोण, राज्य संवर्गातील आहात काय, तुमचे साहेब कोण, या विरोधी पक्षनेत्याने केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीला त्यांना सामोरे जावे लागले. आरोग्य निरीक्षकाच्या खुर्चीत लिपिकाला बसविल्याने हा घोळ झाल्याची चर्चा आहे.
पालिकेची आरोग्य सेवा
372 टक्के तुटीमध्ये
सातारा पालिकेची आरोग्य सेवा ही 2021-22 च्या बजेट नोंदीनुसार 372 टक्के तुटीत आहे. एकत्रित मालमत्ता कर, सेप्टीक टॅंक फी, शौचालय व हॉटेल दाखला फी, विशेष स्वच्छता करातून पालिकेला 2 कोटी 45 लाख 81 हजार रुपये उत्पन्न मिळते. आस्थापना, जंतुनाशके, स्वच्छता मोहिम, रस्ते व गटार सफाई, कचरा संकलनासाठी 11 कोटी 60 लाख 75 हजार रूपये खर्च होतो. त्यामुळे आरोग्य सेवेची तूट तब्बल 372.21 टक्के आहे. यंदाच्या वर्षी एक कोटी 59 लाख 23 हजार 635 रुपयांची जंतुनाशके खरेदी करण्यात आली आहेत. असे असताना औषध फवारणी मोहिमेला आरोग्य विभागातील सावळ्यागोंधळाचा फटका बसला आहे.





