पुणे – भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य असले तरी कॉंग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार असल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलना स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र, निवडणूक अचानक जाहीर झाली आहे. त्यामुळे, या निवडणूकीबाबत तिनही पक्षाचे वरिष्ठ नेते लवकरच एकत्र बैठक घेतील आणि पुढील निर्णय जाहीर करतील असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका जाहीर केली आहे. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडूनही या जागेवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत मतभेद असले तरी 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कॉंग्रेसकडे असल्याने कॉंग्रेसने या जागेवर दावा सांगत निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोल्हापूर, सोलापूर, अंधेरी येथील निवडणुकांमध्ये भाजपने उमेदवार दिला.त्या पार्श्वभूमीवर कसबा पेठ पोटनिवडणुकीची तयारी शहर कॉंग्रेसने सुरू केली आहे. उमेदवारीचे तिकीट कोणाला द्यायचे, याची कॉंग्रेसमध्ये एक पद्धत आहे. इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आली आहेत. लवकरच प्रदेश कमिटीकडून या नावाची घोषणा करण्यात येणार आहे, प्रदेश कमिटीकडून जी अंतिम यादी येईल तो उमेदवार निवडणूक लढवणार आहे. – अरविंद शिंदे, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अचानक जाहीर झाला आहे. याबाबत, स्थानिक पातळीवर काहीच निर्णय झालेला नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊन पुण्यातील जागेबाबत निर्णय घेतली. त्यानुसारच ही निवडणूक बिनविरोध होईल की उमेदवार द्यायचा हे निश्चित केले जाईल. अशाप्रकारे आधीच अंदाज व्यक्त करणे योग्य होणार नाही. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस