पिंपरी | पुजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाचेही अपंगत्व प्रमाणपत्र

पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात दिवसेंनदिवस नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. आता त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून देखील २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचे उघडकीस आले आहे. संबंधित प्रमाणपत्राची नोंद या रुग्णालयात असल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाणपत्र हाडांचे असून त्यामध्ये त्या ७ टक्के अपंगत्व असल्याचे सांगण्यात आले आहे.
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर या विविध कारणांनी चर्चेत आल्या आहेत. खेडकर यांच्या प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहेत. त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे. त्यातील दिव्यांग प्रमाणपत्र अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयातून देण्यात आले आहे. २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग आणि २०२० मध्ये मनोविकार प्रमाणपत्र देण्यात आले.
या दोन्हींचे एकत्रित प्रमाणपत्र सन २०२१ मध्ये देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून देखील खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२ मध्ये हे प्रमाणपत्र दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये त्या ७ टक्के अपंग असल्याचे नमुद असून हे प्रमाणपत्र खरे की खोटे, तसेच त्यांनी हे प्रमाणपत्र कोठे दाखल केले, हा तपासाचा भाग आहे.
अपंगत्वासाठी महापालिका हद्दीतील पत्ता
पुजा खेडकर यांनी वायसीएम रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवासी पत्ता देण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील नागरिक असल्याने महापालिका रुग्णालयात प्रमाणपत्रासाठीचा अर्ज स्विकारण्यात आला. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात आली. मात्र, पुजा खेडकर या खरोखरच महापालिका हद्दीत वास्तव्यास होत्या का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रुग्णालयात विविध विभागांतील डॉक्टर तपासणी करुन अपंगत्वाचे प्रमाणपत्र देत असतात. त्याच पद्धतीने खेडकर यांना २०२२ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्यांची नोंद रुग्णालयात असून ऑर्थो विभागाकडून देण्यात आलेल्या या प्रमाणपत्रात त्या केवळ ७ टक्के अपंग आहेत. कोणत्या निकषांवर हे प्रमाणपत्र दिले होते, त्याची पडताळणी करण्यात येत आहे. – डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम पदवीत्तर वैद्यकीय महाविद्यालय.





