दीपोत्सव हा दिव्यांचाच सण, फटाके नाममात्र

पंडित वसंतराव गाडगीळ यांनी जागवल्या आठवणी
पुणे – “दिवाळीत फटाक्यांचा वापर केव्हापासून सुरू झाला हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. मात्र, लहानपणापासून मी जी दिवाळी अनुभवली त्यामध्ये भुईनळी हा एकच फटाका वापरला जात होता. कोणताही आवाज अथवा धूर नसलेला केवळ रंगीबेरंगी रोषणाई असलेला हा फटाका त्यावेळी दिसायचा. घरोघरी तेलाचे दिवे, पणत्या मात्र मोठ्या प्रमाणात असायच्या,’ अशी आठवण पंडित वसंतराव गाडगीळ यांनी सांगितली.
दिवाळीत वापरले जाणारे फटाके आणि त्यामुळे होणारे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण हा गेल्या काही वर्षांपासून गंभीर विषय बनला आहे. यंदा करोनामुळे तर या विषयला अधिक महत्त्व आले आहे. फटक्यांमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, या फटाक्यांवर बंदी घालावी अशी मागणी सातत्याने होत आहे.
तर केवळ दिवाळीतच फटाक्यांवर बंदी का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दिवाळी सेलिब्रेशन आणि फटाके यांचा खरंच संबंध आहे का? या विषयावर “प्रभात’ने पंडित गाडगीळ यांच्याशी संवाद साधला.
यावेळी गाडगीळ म्हणाले, “साधारण 80 वर्षांपूर्वीपासून जी दिवाळी मी अनुभवली, तेव्हा फटाके हे अगदी नाममात्र वापरले जात असत. दीपोत्सव हा तेलाचे दिवे, पणत्या पेटवून साजरा केला जायचा. घरोघरी लावलेले दिवे, पणत्या आणि कंदिलांनी उजळलेला परिसर म्हणजे एक आनंददायी दृश्य असायचे. त्यात अगदी नाममात्र प्रमाणात रंगीबेरंगी आणि कोणताही आवाज अथवा धूर नसलेला भुईनळी हा फटाका वापरला जायचा. दिवाळीचे ते स्वरूप अतिशय प्रसन्न वाटत असे.’





