Dinesh Karthik Statement : “श्रेयस अय्यरवर खूप लवकरच…”, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकचं भारतीय कर्णधाराबद्दल मोठं वक्तव्य
Dinesh Karthik Statement : इंग्लंडविरुद्धच्या खराब सुरुवातीनंतर भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने 'स्काय स्पोर्ट्स क्रिकेट'शी बोलताना कर्णधार अय्यरवर वाढत्या दबावाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Dinesh Karthik Statement On Shreyas Iyer Captaincy IND vs ENG T20I : इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर टी-२० सामन्यात मिळालेल्या ४ गडी राखून पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर चौफेर टीकेचा धनी झाला आहे. आयर्लंडविरुद्ध २-० अशा ऐतिहासिक पराभवानंतर, इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि आता दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभवाचा धक्का बसला. या खराब सुरुवातीनंतर भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने ‘स्काय स्पोर्ट्स क्रिकेट’शी बोलताना कर्णधार अय्यरवर वाढत्या दबावाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
अय्यरवर दबाव वाढणार; कार्तिकचा स्पष्ट इशारा –
भारतीय संघाच्या सद्यस्थितीचे विश्लेषण करताना दिनेश कार्तिक म्हणाला, “मी या परिस्थितीला लगेचच संकट म्हणणार नाही, पण हे नक्की की भारतीय संघाला सलग तीन सामने हरण्याची अजिबात सवय नाही. त्यातही यातील दोन पराभव आयर्लंडसारख्या संघाविरुद्ध झाले आहेत. त्यामुळे निश्चितच नवीन कर्णधार श्रेयस अय्यरवर दबाव वाढणार आणि त्याच्यावर प्रश्नही उपस्थित केले जातील. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की संघ व्यवस्थापन काय बदल करू शकते? मँचेस्टर सामन्यात भारताची फलंदाजी ठीक होती, पण गोलंदाजीत रवी बिश्नोईच्या कामगिरीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.”
मॅच-विनर जेकब बेथेलचे केले कौतुक –
कार्तिकने १९१ धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या जेकब बेथेलचे जाहीर कौतुक केले. बेथेलने ४६ चेंडूंत नाबाद ७६ धावांची वादळी खेळी खेळली. कार्तिक म्हणाला, “बेथेल हा प्रचंड आत्मविश्वास असलेला खेळाडू आहे. सुरुवातीला त्याला हवे तसे पॉवर-शॉट्स खेळता येत नव्हते, पण त्याने ज्या संयमाने परिस्थिती हाताळत सामना संपवला, ते कौतुकास्पद आहे.”
७ जुलैला नॉटिंघममध्ये मालिका वाचवण्याचे आव्हान –
सलग पराभवांमुळे बॅकफूटवर आलेली टीम इंडिया आता ७ जुलै रोजी नॉटिंघम येथे इंग्लंडविरुद्ध तिसरा टी-२० सामना खेळण्यासाठी उतरेल. पाच सामन्यांच्या या मालिकेत जिवंत राहण्यासाठी श्रेयस अय्यरच्या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकून १-१ अशी बरोबरी साधावीच लागेल. आता गेल्या सामन्याचा विलन ठरलेल्या रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळतो की त्याला आणखी एक संधी दिली जाते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





