Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना मिळणार अनुदान – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई – पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (14 जून) केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपुर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पुर्व नियोजनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अथितीगृह येथे विशेष बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या निर्णयाचे बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायाने टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची, तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोल माफी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आहे. सरकराने कमी वेळात शेतकरी, माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतले आहेत.
आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह, विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी एसओपी निश्चित केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





