Dimbhe Dam: डिंभे धरणात केवळ २.६३% पाणीसाठा! बळीराजा चिंतेत, पावसासाठी आकाशाकडे डोळे
Dimbhe Dam: आंबेगाव, जुन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा तळाला.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुक्यासह जुन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष सध्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे लागले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे अत्यंत आवश्यक असताना अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
डिंभे धरण हे आंबेगाव तालुक्यासाठी महत्त्वाचे जलस्रोत मानले जाते. धरण भरल्यानंतर वर्षभर सिंचन, पिण्याचे पाणी तसेच विविध योजनांसाठी मोठा आधार मिळतो. आंबेगाव, जुन्नर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांनाही या धरणातील पाण्याचा लाभ होतो. सध्या धरणात केवळ सुमारे २.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरणातील जलसाठ्यात २९ टक्के लक्षणीय वाढ होण्यास मदत झाली होती.
यंदा मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाले असून गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊस सुरू झाला असला तरी त्याचा वेग आणि प्रमाण अपेक्षेइतके नाही. पावसाचा जोर वाढून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांतील पावसावरच धरणातील जलसाठ्याचे चित्र अवलंबून राहणार आहे.
“डिंभे धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगामाला आधार मिळेल. सध्या जलसाठा कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस होण्याची अपेक्षा आहे.”
– धनंजय फलके,उपसरपंच, अमोंडी.





