Dimbhe Dam: बळीराजा सुखावला! डिंभे धरणातील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ; पाहा सोमवारची ताजी आकडेवारी
Dimbhe Dam: आंबेगाव तालुक्यासह परिसराचा महत्त्वाचा आधार असलेल्या डिंभे धरणात अवघ्या ३६ तासांत मोठा जलसाठा जमा; पाऊस असाच राहिल्यास जलसंकट टळणार.

Dimbhe Dam – आंबेगाव तालुक्यासह परिसरातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी महत्त्वाचा आधार असलेल्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे) धरणाच्या जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सोमवार दि.६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत धरणातील जलसाठा १८.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा केवळ ८.९६ टक्के होता.
तर ६ जुलै रोजी सकाळी तो १४.१२ टक्के झाला आणि दिवसभर झालेल्या पावसामुळे सायंकाळ ४ वाजेपर्यंत तो वाढून १८.२२ टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम सुरू झाल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना या वाढत्या जलसाठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाणलोट क्षेत्रात अशीच दमदार पावसाची हजेरी कायम राहिल्यास धरणातील साठ्यात आणखी भर पडून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाकडूनही उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“डिंभे धरणातील जलसाठ्यात समाधानकारक वाढ होत असून ही सकारात्मक बाब आहे. उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे.”
– दत्तात्रय कोकणे, उपअभियंता, जलसंपदा विभाग कुकडी प्रकल्प.





