Shirur News : डिंबा कालव्याच्या पाणीवाटपात शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय? आंदोलनाचा इशारा!
Shirur News : डिंबा उजव्या कालव्याच्या पाणीवाटपात शिरूरमधील शेवटच्या गावांवर अन्याय होत असल्याचा आरोप. चार दिवसांत पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा.

Shirur News : डिंबा उजव्या कालव्याच्या पाणीवाटपात शिरूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांवर अन्याय होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रब्बी हंगामाचे आवर्तन सुरू होऊन पंधरा दिवस उलटले, तरी सविंदणे, कवठे यमाई, मलठण, सोने सांगवी, निमगाव भोगी, कर्डिलवाडी आणि अन्नापूर येथील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालव्याच्या शेवटच्या टोकावरील गावांना आधी पाणी देऊन त्यानंतर मागील गावांकडे पाणी सोडणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात पाठीमागून पाणी सोडले जात असल्याने शेवटच्या गावांतील शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. पाणीवाटपात समानता आणि पारदर्शकता नसल्याचा आरोपही होत आहे.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी वाया –
वाळूंजनगर आणि रानमळा परिसरात कालव्याला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आला आहे. कालव्याची देखभाल आणि दुरुस्ती वेळेत का केली जात नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती –
रब्बी पिके वाढीच्या अवस्थेत असताना पाणी न मिळाल्यास बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
चार दिवसांत पाणी देण्याची मागणी –
कालव्याच्या पाणीवाटपात सुधारणा करून शेवटच्या गावांना प्रथम पाणी द्यावे, भगदाडे बुजवावीत आणि पाणीवाटपाचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी मलठणचे माजी सरपंच नानासाहेब फुलसुंदर यांनी केली आहे. चार दिवसांत संबंधित गावांना पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.





