Dilip Walse Patil: पुणे-मंचर मार्गे नाशिक रेल्वे होणार की नाही? वळसे पाटलांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले
Dilip Walse Patil: आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांच्या विकासासाठी पुणे-मंचर-नाशिक रेल्वेच आवश्यक; उद्योग आणि पर्यटनाला मिळणार मोठी चालना.

Dilip Walse Patil – पुणे–अहिल्यानगर मार्गे नाशिक रेल्वे मार्ग निश्चित झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली असली, तरी पुणे–मंचर मार्गे नाशिक रेल्वे मार्ग साकारण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच असल्याची स्पष्ट ग्वाही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मंचर येथे रविवार (दि. २८) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,
सभापती कैलास बुवा काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य विष्णू काका हिंगे पाटील, बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, शरद बँकेचे संचालक अजय घुले, अॅड. राहुल पडवळ यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव, जुन्नर, खेड आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने पुणे–मंचर मार्गे नाशिक रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. या मार्गामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल.
उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठा फायदा होईल. या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यापूर्वी सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच पुन्हा बैठक घेऊन हा विषय प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने सुरू ठेवणार असून,
या भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे–मंचर मार्गे नाशिक रेल्वे हा केवळ वाहतुकीचा विषय नसून संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाशी निगडित असल्याने हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांत कोणतीही कसूर ठेवणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
“पुणे–मंचर मार्गे नाशिक रेल्वे हा जनतेच्या विकासाचा प्रश्न आहे. हा मार्ग प्रत्यक्षात यावा यासाठी शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असून, आवश्यक त्या सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू ठेवणार आहे.”
– दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री




