मंचर : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार तेथील कार्यकर्त्याला संधी दिली जात होती. मात्र, या पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वे करून ज्या कार्यकर्त्याला लोकांचा पाठिंबा आहे. अशा कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल व उमेदवारी दिली जाईल, असे आवाहन माजी सहकार मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शनिवार, दि. २१ रोजी केले. आंबेगाव तालुका महायुतीच्या वतीने आमदार दिलीप वळसे पाटील निवडून आल्याबद्दल आभार मेळाव्याचे आयोजन मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचिन भोर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले, जिल्हा सचिव प्रमोद बाणखेले, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे,रामशेठ गावडे, किरणताई वळसे पाटील, पूर्वाताई वळसे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, सुषमा शिंदे ,प्रकाश पवार, राजेंद्र गावडे, उद्योजक रमेशशेठ लबडे, लक्ष्मणराव काचोळे, बाबाजी टेमगिरे, सुनील बाणखेले,सचिन बांगर, सोपानराव नवले, सोमनाथ काळे, संतोष सैद आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले, पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागा. समोरचा उमेदवार २४ तारखेपासून कामाला लागला आहे. जे पराभूत झाले ते गावच्या पाटलासारखे फिरत आहेत. आपण विजयी झालो तरी लाजत लाजत फिरत आहे. असेही वळसे पाटील म्हणाले. मात्र, मी बाहेर गेल्यानंतर तालुक्यात कोण लक्ष देणार,आपले सर्व कार्यकर्ते व्यवसाय, उद्योग करणारे पार्ट टाइम कार्यकर्ते असल्याने पूर्ण वेळ तालुक्याला देत नाहीत. आपण निवडणुकीच्या काळात जागे होतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी आजारी असल्याने सहा महिने माझा जनसंपर्क कमी झाला त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला असेही वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुक्यात मार्केट कमिटी, कारखाना यावर निवडून येणारे संचालक यांना एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही. मात्र निवडून आलेले संचालक पक्षासाठी वेळ देत नाही. याबाबत वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त केली. १० वर्ष माझ्याकडे मंत्रीपद असताना तालुक्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली.दहा वर्षांच्या काळात त्यांनी गावागावात फिरून पक्षाचे दोन गट तयार केले. त्यात आपले कार्यकर्ते ही सहभागी झाले. अशी टीका देवदत्त निकम यांचे नाव न देता केली. भाजपचे नेते जयसिंगराव एरंडे म्हणाले, मात्र, आता झालं गेलं विसरून जा खांद्याला खांदा लावून यापुढील निवडणूक आपल्या सर्वांना लढवायच्या आहेत. पंधराशे मतांनी निवडून आलेला निकाल कट्टर कार्यकर्त्याला मान्य नाही. निवडणूक काळात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रीचा दिवस केला त्याची नोंद पक्षाने घ्यावी. या पुढील काळात महायुतीच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्व पक्षांना योग्य तो मानसन्मान द्यावा, वळसे पाटील घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, वळसे पाटलांना मंत्रिपद मिळाले नाही तर आपली कामे होणार नाही. असे अनेक जण म्हणतात. मात्र वळसे पाटलांना मंत्रिपद मिळो अथवा न मिळो त्यांना काही फरक पडत नाही ते ज्येष्ठ नेते असून त्यांच्या शब्दाला मंत्रिमंडळात मान आहे. मंत्री नसतानाही त्यांनी एखादा शब्द टाकला तर त्यांचे काम तात्काळ होईल. निरगुडसर येथील कन्या जानवी संजय वळसे पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांची प्रतिमा स्केचद्वारे तयार करून त्यांना भेट देण्यात आली. जागृती महाजन, क्रांतीताई गाढवे, जयसिंगराव एरंडे, जयश्री पलांडे,अरुण गिरे,नंदकुमार पिंगळे, इत्यादींची भाषणे झाली. प्रास्ताविक तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले. तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अंकित जाधव यांनी आभार मानले.