पिंपरी – आमदारांपाठोपाठ आता खासदारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने स्थानिक पातळीवरील शिवसैनिकांची मोठी कोंडी झाली आहे. शिंदे गटाकडे जावे की ठाकरेंसाबत राहवे अशी द्विधा मनस्थिती स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे देखील सहभागी झाले आहेत. शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही शिंदे गटात गेले आहेत. आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
आमदारांचा मोठा गट शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आता खासदारही गेले आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्याजागी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहेत. शेवाळे यांच्या निवडीला खासदार बारणे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारणे शिंदे गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले.
पिंपरी-चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बारणे लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजपची समान राजकीय ताकद आहे.
चिंचवड, पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे शिंदे गटात गेले आहेत. पिंपरी आणि मावळात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मावळात राष्ट्रवादीचा आमदार असला. तरी, भाजपची संघटनात्मक ताकद चांगली आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करुन खासदार बारणे यांनी भाजपसोबत युती केलेल्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा राजकीय वतुर्ळत सुरू आहे. बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे शहर युवासेना प्रमुख आहेत.
बारणे समर्थकांकडे लक्ष
खासदार बारणे शिंदे गटात डेरेदाखल झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने त्यांचे समर्थक का निर्णय घेणार, याकडे शहरातील राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.
भोसरीतही खिंडार पडणार?
शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी खासदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभेच्या महिला विभाग संघटिका आशा भालेकर या आढळराव यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे आल्हाट, उबाळे, भालेकर हे काय भूमिका घेतात. आढळराव यांच्यासोबत शिंदे गटात दाखल होतात की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.