पिंपरी | घोडीवली-अंजरूण मार्गावरील पुलाची दुरवस्था

खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील घोडीवली, नावंढे, अंजरूण आणी इतर काही गावांच्या दळणवळणासाठी गेली अनेक वर्षे वापरात असलेल्या पुलाची सध्या दुरवस्था झाली आहे. घोडीवली-अंजरूण रस्त्यावरील हा पूल वाहतूकीसाठी धोकादायक बनला असून पुलाला संरक्षण कठडे देखील नाहीत.
यासोबतच पुलावर जागोजागी खड्डे पडले असून धोकादायक असलेला हा पूल प्रशासन नक्की कधी दुरूस्त करणार आणि नव्या पुलाची उभारणी कधी होणार? असा सवाल सामान्य नागरिक आणि प्रवासी, वाहन चालक करत आहेत.
आधीच धोकादायक असलेला पूल या विकेंडला झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घोडीवली, नावंढे गावांत अडीच ते तीन हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. येथील नागरिकांसाठी हा पुल महत्वाचा आणि गरजेचा आहे.
पुलावरून पाणी गेले की नागरिकांचा खोळंबा होतो. दररोज शेकडो नागरिक, शाळकरी मुले येथून ये-जा करत असतात. त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. आता पाऊस असल्याने प्रशासन पावसाचे कारण देऊन वेळ मारून नेऊ शकते. मात्र पुलाची डागडुजी होणे गरजेचे आहे, अन्यथा मोठा अपघात होऊन जिवितहानी होऊ शकते.
गेली अनेक वर्षे हा पूल धोकादायक अवस्थेत आहे तसाच आहे. त्यावरून वाहतूक सुरू आहे. पुलावर खड्डे पडलेत, कठडे तुटलेत तरीही प्रशासन त्याची दुरूस्ती करत नाही. विकासकामांचा डंका वाजविणारे सत्ताधारी याची दखल घेत नाही. हा पूल लवकर दुरूस्त करावा, ही आमची मागणी आहे. – नवज्योत पिंगळे, घोडीवली





