डिजिटल चलनामुळे पैशाचे वेगात हस्तांतरण होईल; काळ्या पैशाला वचक बसण्यास होणार मदत

नवी दिल्ली – रिझर्व बॅंक लवकरात स्वतःचे डिजिटल चलन उपलब्ध करणार आहे. यामुळे पैशाचे वेगात हस्तांतरण होईल. त्याचबरोबर नोटा छापण्याचा खर्च कमी होईल असे डेलॉंईट या संस्थेच्या अभ्यास अहवालात म्हटले आहे.
ब्लॉकचैन तंत्रज्ञानाचा वापर करून रिझर्व बॅंक या वर्षात डिजिटल करन्सी उपलब्ध करणार असल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली आहे. जगातील अनेक देशांच्या रिझर्व बॅंका अशा प्रकारची डिजिटल करन्सी उपलब्ध करण्याचा विचार करीत आहेत. भारत सरकारने या कामी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे भारताची डिजिटल करन्सी इतर देशापेक्षा अधिक लवकर उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या मोठ्या रकमा पाठविताना अनेक टप्प्यातून जावे लागते. त्यामुळे बराच वेळ लागतो. त्याचबरोबर डिजीटल करन्सीमुळे काळा पैसा शोधण्यात बरीच मदत होणार असल्याचे समजले जाते.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे या सर्व पैशाचा हिशोब लागण्यास वेळ लागत नाही.
चीनने 2014 मध्ये डिजिटल करन्सी सुरू केली होती. आता रिझर्व बॅंकेचा या विषयावरील गृहपाठ पूर्ण झाला असून रिटेल आणि कार्पोरेट स्तरावर प्रायोगीक डिजिटल करन्सी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बेफाम वाढणाऱ्या क्रिप्टॉकरन्सीला यामुळे वचक बसेल असे समजले जाते.





