दहावीच्या निकालात गुणांमध्ये तफावत

पुणे – सीबीएसई बोर्डाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल आणि लेखी परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या प्रमाणात खूप जास्त तफावत आहे. त्यामुळे या संदर्भात सीबीएसईने शाळांना त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.
सीबीएसई बोर्डाने जवळपास ५०० संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांच्या लिखित आणि प्रात्यक्षिक गुणांमध्ये लक्षणीय फरक पाहिला होता. त्यानंतर बोर्डाने परिपत्रक जारी करून शाळांना प्रात्यक्षिक परीक्षांचे सखोल मूल्यमापन करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
प्रगत साधनांद्वारे मागील वर्षांतील निकाल डेटाच्या आधारे, संलग्न शाळांमधील ५० टक्के किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये काही विषयांमध्ये सिद्धांत आणि व्यावहारिक विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे.
तसेच स्कोअरमध्ये लक्षणीय फरक आढळला असल्याचे सीबीएसईने म्हटले आहे. अधिक मजबूत आणि पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी बोर्डाने शाळांना त्यांच्या अंतर्गत मूल्यांकन प्रक्रियेची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.





