पुसेगाव, (प्रतिनिधी) – शिवसेनेत अलीकडे झालेल्या बदलांनंतर, कोरेगाव मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेने मार्गक्रमण करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम राहिले. संघटनेत दरी निर्माण झाली असली, तरी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना, पक्षातून दुरावलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांनी साथ द्यावी, यासाठी मतदारसंघात भेटीगाठींचा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती मतदारसंघाचे संघटक पै. जालिंदर गोडसे यांनी दिली. गोडसे हे कोरेगाव-खटाव मतदारसंघातील शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या घरी भेटी देत आहेत. या शिवसैनिकांना पक्ष संघटनेच्या कार्यात पुन्हा सामील होण्यासाठी साद घालत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्व अंगिकारलेल्या शिवसैनिकांनी गेली तीस-पस्तीस वर्षे जिल्ह्यात आणि कोरेगाव मतदारसंघात शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह जपण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मातबरांच्या विरोधात लढवलेल्या आहेत. दुष्काळी भागाच्या पाणीप्रश्नासाठी शिवसैनिकांनी केलेली आंदोलने आणि संघर्ष नजरेआड करता येणार नाही, असे गोडसे यांनी सांगितले. पक्ष संघटनेचे राजकीय अस्तित्व पूर्णपणे शिवसैनिकांवरच अवलंबून आहे. त्यामुळे ज्येष्ठ शिवसैनिकांच्या व्यथा, वेदना जाणून घेऊन, कोरेगाव मतदारसंघातील जुन्या-नव्या शिवसैनिकांची सांगड घालून संघटना मजबूत करणे, मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला निधी आणि शिवसेनेमार्फत राबवण्यात येत असलेल्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव व चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.