Diabetes-Obesity Awareness: लठ्ठपणा आणि मधुमेह : धोकादायक जोडगोळी; वेळेत उपाय केल्यास टाळता येतात गंभीर आजार
Diabetes-Obesity Awareness लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. जवळपास ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये या दोन्ही समस्या एकत्र आढळतात. या धोकादायक संयोजनाला “मेटाबॉलिक कॉम्बिनेशन” असे म्हटले जाते.

Diabetes-Obesity Awareness: भारताला आज “मधुमेहाची राजधानी” म्हटलं जातं. कारण देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समाजातील कोणताही स्तर या आजारापासून दूर नाही. मधुमेहामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे आजार, गॅंग्रीन, पॅरालिसीस, लिव्हरचे विकार आणि वंध्यत्व यांसारख्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात.
लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे एका नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे आहेत. जवळपास ५० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये या दोन्ही समस्या एकत्र आढळतात. या धोकादायक संयोजनाला “मेटाबॉलिक कॉम्बिनेशन” असे म्हटले जाते. दोन्ही आजार परस्परावलंबी असून एकमेकांना वाढवतात.
लठ्ठपणाचे दोन प्रकार मानले जातात, सिंपल ओबेसिटी आणि कॉम्प्लेक्स ओबेसिटी. सिंपल ओबेसिटीमध्ये इतर कोणताही आजार नसतो, पण हा प्रकार अतिशय दुर्मीळ आहे. बहुतांश वेळा लठ्ठपणासोबत इतर व्याधी आढळतात. भारतीयांमध्ये बीएमआयच्या आधारे ओव्हरवेट, ग्रेड वन ओबेसिटी आणि पुढील उच्च ग्रेड असे वर्गीकरण केले जाते.
लठ्ठपणाचे दुष्परिणाम अनेक आहेत. अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर ताण येतो आणि लहान वयातच सांधेदुखी सुरू होते. हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते. मुलींमध्ये पाळी अनियमित होणे, महिलांमध्ये वंध्यत्व, गर्भधारणेत अडचणी, थायरॉईडचे विकार दिसतात. पुरुषांमध्ये हार्मोन बिघाड, शुक्रजंतूंची कमी वाढ अशा समस्या दिसतात. श्वसनसंस्थेवर दाब येऊन थोड्या श्रमाने दम लागणे, झोपेत घोरणे, सकाळी थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. वाढलेला पोटाचा घेर केवळ दिसण्याचा प्रश्न नसून अनेक आजारांना आमंत्रण देतो.

Diabetes-Obesity
ओबेसिटी ही केवळ बाह्य स्वरूपाची समस्या नसून शरीरातील मेद पेशींशी संबंधित आहे. या पेशी विविध रसायने स्त्रवून चयापचय क्रियेत बिघाड करतात. त्यामुळे योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करणे गरजेचे आहे.
उपायांमध्ये सर्वप्रथम योग्य आहार महत्त्वाचा आहे. प्रत्येकासाठी एकच डाएट योग्य नसते. व्यक्तीची जीवनशैली, सवयी आणि आजार लक्षात घेऊन आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. क्रॅश डाएट धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मूत्रपिंडाचे विकार, हाडे ठिसूळ होणे, जीवनसत्वांची कमतरता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दुसरे म्हणजे नियमित व्यायाम. दररोज किमान एक तास व्यायाम करणे फायदेशीर ठरते. मात्र हृदय व गुडघ्यांच्या स्थितीनुसार योग्य व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. वजन कमी करणारी जादुई औषधे अस्तित्वात नाहीत. बाजारातील अनेक औषधे धोकादायक असू शकतात.
ज्यांना उच्च ग्रेड ओबेसिटी आहे आणि त्यासोबत मधुमेह किंवा इतर गंभीर व्याधी आहेत, त्यांच्यासाठी बॅरिऍट्रिक सर्जरी हा सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. दुर्बिणीद्वारे केली जाणारी ही शस्त्रक्रिया पचनसंस्थेत बदल करून वजन कमी करते आणि मधुमेह, रक्तदाब आटोक्यात आणण्यास मदत करते. अनेक रुग्णांना मधुमेहाच्या औषधांची गरज कमी किंवा पूर्णपणे बंद होते.
वेळेत योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदल केल्यास लठ्ठपणा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते आणि निरोगी आयुष्य जगता येते.





