धुळे: सरकारी जमिनीवर अतिक्रमण भोवले; महिला सरपंच अपात्र

धुळे: सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे धुळे तालुक्यातील सोनगीर येथील महिला सरपंच रंजना मोरे यांना चांगलेच अंगलट आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले आहे. विशेष म्हणजे, एकाच पंचवार्षिक काळात सोनगीर गावात दुसऱ्यांदा सरपंच अपात्र ठरले असून, यावेळी भाऊजयीविरोधात नणंदेने तक्रार केल्याने ही कारवाई झाली.
ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या वार्ड क्रमांक एकच्या पोटनिवडणुकीत रंजना मोरे विजयी झाल्या आणि जानेवारी 2024 मध्ये त्या सरपंच झाल्या. मात्र, निवडणूक नामनिर्देशपत्रात त्यांनी स्वतःचे घर अतिक्रमण नसल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात, सोनगीर ग्रामपंचायतीच्या नोंदींनुसार त्यांचे बांधकाम सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याची तक्रार माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात अतिक्रमण सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी रंजना मोरे यांना अपात्र ठरवले.
नात्यातील तक्रारींमुळे दोन सरपंचांचे पतन
हा प्रकार सोनगीरसाठी नवा नाही. याच पंचवार्षिक काळात माजी सरपंच रुक्मिणी ठाकरे यांनाही त्यांचे भाऊ श्यामलाल मोरे यांच्या तक्रारीमुळे सरपंचपद आणि सदस्यत्व गमवावे लागले होते. आता नात्यातीलच तक्रारींमुळे रंजना मोरे यांचे सरपंचपद गेले आहे. एकाच पंचवार्षिक काळात दोन सरपंच अपात्र होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. सरकारी जमिनीचा दुरुपयोग किती महागात पडू शकतो, याचे हे उदाहरण आहे.





