Sharad Pawar | शरद पवारांच्या भाषणादरम्यान वादळ सुटले; बॅनर कोसळले !

Sharad Pawar | Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. यंदा काँग्रेस 328 जागांवर निवडणूक लढत आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी ‘अबकी बार, 400 पार’चा नारा दिला आहे.
या निवडणुकीसाठी भाजपपासून काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांचे प्रतिनिधी रिंगणात उभे केले आहेत. सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा पाचवा टप्पा सुरु आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे. प्रचारासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा आणि रोड शो घेतले जात आहेत.
आज धुळे लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांसह विविध नेते उपस्थित होते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदान होणार आहे.
डॉ. बच्छाव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेला महाविकास आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या प्रचारसभेला मोठा प्रतिसाद मिळाला.
सटाण्यात सुरु असलेल्या सभेच्या वेळी वादळ सुटले. त्यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. या वादळामुळे व्यासपीठावर मागील बाजूला असलेले बॅनर पडले. यामुळे परिस्थिती पाहून शरद पवार यांनी आपले भाषण थोडक्यात आवरते घेतले.
दरम्यान, हे बॅनर कोसळल्याने कोणालाही इजा झाली नाही. अचानक झालेल्या या घटनेमुळे उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले…..
सटाण्यातील सभेत बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही. आम्ही सत्तेवर असताना माझ्या विरोधात भाजपावाल्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून घोषणा दिल्या होत्या.
परंतु आता सरकार असताना भाव देत नाही. यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले. यामुळे कांदा उत्पादक जिराईत शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत होते. परंतु सरकारने निर्यात बंदी केली. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे.





