धोनीने पुढील स्पर्धाही खेळावी – काशी विश्वनाथ

चेन्नई -महेंद्रसिंह धोनी याने चेन्नई सुपर किंग्जकडून आणखी किमान एक वर्ष खेळावे, अशी आशा संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी व्यक्त केली आहे. धोनीला यंदाच्या आयपीएल मोसमात गुडघ्याला झालेल्या दुखापतीने त्रस्त केले आहे. त्याला सातत्याने आईसपॅक लावावा लागत आहे.
मात्र, तो सरावात कसून मेहनत घेत आहे. तसेच एकेरी व दुहेरी धावा काढण्यावरही सरावात भर देत आहे. एकूणच त्याची देहबोली पाहता ते यंदाच्या मोसमानंतर निवृत्ती जाहीर करेल असे वाटत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
धोनीशी जितका संवाद होतो त्यावरून तसेच त्याच्या बोलण्यातून असा कोणताही संकेत मिळत नाही. मात्र, त्याची दुखापत पाहून प्रेक्षक आपापली मते बनवत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही असा आम्हाला विश्वास आहे. धोनीचे प्रत्येक सामन्यात मोठे योगदान असते,
तसेच संघातील त्याची उपस्थितीच नवोदितांसाठी एक प्रेरणा असते. त्याच्या निर्णयक्षमतेवर तर कोणीही शंका घेणार नाही, त्यामुळे त्याच्या हातून भारताला येत्या काळातही सुरेश रैना व रवींद्र जडेजासारखे अव्वल खेळाडू मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





