धोनीमुळे माझी कारकीर्द वाचली – ब्राव्हो

नवी दिल्ली – वेस्ट इंडिज संघाचा एकेकाळचा अष्टपैलु क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यामुळेच माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनर्जन्म झाला असे मत व्यक्त करत धोनीचे आभारही मानले आहेत.
मला ज्यावेळी अपयश येत होते. माझ्याकडून फलंदाजी व गोलंदाजी सरस होत नव्हती त्यावेळी मला वेस्ट इंडिज संघातील स्थानही गमवावे लागले होते. त्याचवर्षी आयपीएल स्पर्धेतील लिलाव प्रक्रियेत मला कोणताही संघ घेणार नाही असेही मला वाटले होते. मात्र, केवळ धोनीच्या आग्रहामुळे चेन्नइ सुपरकिंग्ज संघाने मला आपल्या संघात घेतले, असे ब्राव्हो म्हणाला.
या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात मला धोनीने वेळोवेळी मार्गदर्शन केले. माझी नकारात्मकता बाजुला काढून सरस कामगिरीसाठी प्रोत्साहन केले. त्याच्या याच मौलिक सहकार्यामुळे माझा क्रिकेट जगतात पुनर्जन्म झाला. त्यासाठी धोनीचे आभार मानावे तितके थोडेच आहेत, अशा शब्दात ब्राव्होने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
2011 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत मला स्थान मिळणार नाही असे वाटत असतानाच चमत्कार घडला व धोनीने माझ्यासाठी आग्रह धरला व माझ्या देशाच्या संघातही निवड झालेली नसली तरीही धोनीने मला आयपीएल खेळण्याची संधी मिळवून दिली. तो केवळ कर्णधार म्हणून मोठा नाही तर एक माणूस म्हणूनही मोठा आहे. त्याने माझ्या अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी मला मोकळीक दिली, नैसर्गिक खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
हे सर्व त्याने त्याच्यासाठी नाही तर माझ्यासाठी केले यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. त्यामुळेच मला धोनीला काहीतरी भेट देण्याची इच्छा आहे, मात्र ती भेट क्रिकेटच्या मैदानावर देण्याचा मी प्रयत्न करीन, असेही ब्राव्हो म्हणाला.





