मॅच टू मॅच खेळल्याने धोनी अपयशी

नवी दिल्ली – महेंद्रसिंग धोनीला जर दरवर्षी केवळ आयपीएल स्पर्धेतच खेळायचे असेल तर त्याला सातत्याने सराव करणे गरजेचे आहे. तसेच अन्य देशांतील टी-20 स्पर्धांमध्येही त्याने सहभाग घेतला पाहिजे, तरच तो यशस्वी ठरेल, अन्यथा केवळ मॅच टू मॅच खेळ केला तर तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेप्रमाणे अपयशी ठरेल, असे मत माजी कर्णधार व महान कसोटीपटू कपिल देव यांनी व्यक्त केले आहे.
अमिरातीत यंदा सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत करोनामुळे सर्व खेळाडूंना फारसा सराव झालेला नसतानाही सामने खेळावे लागत आहेत. त्यामुळेच धोनी देखील अपयशी ठरला आहे. त्याने केवळ आयपीएल स्पर्धाच खेळायच्या ठरवल्या तर त्याला असेच अपयश नेहमीच येत राहील, असेही ते म्हणाले.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यंदाच धोनीच्या संघाला प्ले-ऑफमध्येही स्थान मिळू शकले नाही. या स्पर्धेत धोनी जवळपास दीड वर्षांनंतर सहभागी झाला होता, त्यामुळेच त्याला सामन्यांचा तसेच सरावाचाही लाभ घेता आला नाही. त्यामुळेच त्याच्यासह संपूर्ण संघ अपयशी ठरला, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.
प्रथम दर्जाचे सामने खेळावेत
धोनीला जर दरवर्षी आयपीएल स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, तर त्यापूर्वी त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत तसेच प्रथम दर्जाचे सामने खेळले पाहिजेत तरच तो यशस्वी होइल, असेही कपिल यांनी नमुद केले.





