Anjali Damania : बीड, परभणी प्रकरणात धसांची भूमिका दुटप्पी; सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचा आरोप

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दमानिया सोमवारी म्हणाल्या की, सोमनाथ सूर्यवंशी यांची कथितपणे दुर्दैवी हत्या झाली. यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. त्याला माझे पूर्ण समर्थन आहे. केवळ निलंबन करून काय होणार? त्यांना घरबसल्या पगार मिळेल. निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल. कामावर आल्यानंतर ते पुन्हा तसेच करतील. असे चालणार नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
भाजप सुरेश धसांकडून वदवून घेत आहे
भाजप आमदार सुरेश धस हे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण व बीड येथील संतोष देशमुख हत्याकांड या दोन्ही प्रकरणात दुटप्पीपणा दिसून येत आहे. संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करताना ते सातपुडा बंगल्यात खंडणीचा 3 कोटींचा व्यवहार झाल्याचा दावा करतात. पण काल त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आपली नसल्याचे ते म्हणाले. सूर्यवंशी प्रकरणात एकीकडे ते लाँग मार्चमध्ये सहभागी होतात. पण त्याचवेळी ते पोलिसांवर कोणतेही गुन्हे दाखल न करण्याची विनंती करतात. ही टुटप्पी भूमिका भाजपच त्यांच्या तोंडून वदवून घेत असल्याचा संशय आहे.
बावनकुळेंच्या भेटीनंतर भाषा बदलली
धस यांची जी भूमिका आहे ती अचानक कशी काय बदलली? हा माझा त्यांना प्रश्न आहे अचानक ते युटर्न घेताना पाहायला मिळतात. त्यांनी अशा पद्धतीने विधान करणे संकेतांना धरून नाही. मला तर माझ्या खात्रीलायक सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. त्यांना त्यांची भूमिका बदलायला किंवा सौम्य करण्यास सांगण्यात आले आहे, आणि हेच कारण आहे की त्यांची वक्तव्य सुद्धा आता बदलत चालली आहेत, असा गौप्यस्फोटही अंजली दमानिया यांनी केला आहे.





