Dharmaveer 2: ‘महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना…’; ‘धर्मवीर 2’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय, प्रदर्शनाची तारीख बदलली

Dharmaveer 2 | Anand Dighe : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांनी या ट्रेलरला तुफान पसंती दिली आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.
‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती.
येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
मात्र, अश्यातच या चित्रपटाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. स्वतः या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
नेमकं मंगेश देसाई काय म्हणाले? पाहा….
गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही गावं पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणं योग्य वाटत नाही.
महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर इतक्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू’. असं मंगेश देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना आणखी काही दिवस या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.





