बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर 2’ चा टीझर रिलीज

मुंबई : ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्यावर असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता ‘धर्मवीर 2 ’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चाहते ‘धर्मवीर 2’ ची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ‘धर्मवीर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.
काय आहे टिझरमध्ये ?
चित्रपटाच्या पहिल्याच टीझरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ प्रदर्शित करत ‘ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की….धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!! धर्मवीर – २… साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ असं म्हटलं आहे.चित्रपटाच्या टीझरमध्ये, एक मुस्लिम महिला आनंद दिघे यांच्याकडे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला येते. तेव्हा तिला आनंद दिघे बुरखा काढायला सांगतात. चेहरा दाखवण्यास सांगितलं जातं. ती महिला चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं आनंद दिघे यांना दिसतं. ते पाहून त्यांचा संताप होतो. त्यानंतर बहिणीचं रक्षण करण्यासाठी राखी बांधायला आलेल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन आनंद दिघे त्या महिलेच्या घरी जातात. यावेळी “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला शिक्षा देताना दिसतात.
कधी रिलीज होणार चित्रपट?
येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. यंदा हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.प्रसाद ओक पुन्हा एकदा ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते मंगेश देसाई, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल उपस्थित होते.




