Garambicha Bapu: प्रसाद ओक दिसणार नव्या बायोपिकमध्ये; ‘गारंबीचा बापू’मधील लुक समोर
Garambicha Bapu: ‘गारंबीचा बापू’ आता नव्या रूपात

Garambicha Bapu: अभिनेता प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ या सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्याचे काउतूक करण्यात आले. तसेच त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यानंतर आता आणखी एका बायोपिकमध्ये प्रसाद ओक दिसणार आहे. त्याच्या या नव्या सिनेमाचे नाव आहे ‘गारंबीचा बापू’. या सिनेमातील त्याचा पहिला लुक नुकताच समोर आला आहे.
कोकणच्या मातीत रुजलेली, बंडखोरी, सत्ता आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडणारी प्रसिद्ध कथा ‘गारंबीचा बापू’ आता नव्या रूपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ही कथा नव्या पिढीसमोर मांडली आहे.
कोकणातील हर्णै, मुरुड, आंजर्ले, मुर्डी या समुद्रकिनाऱ्यांपासून वर दापोलीपर्यंत पसरलेल्या याच त्रिकोणी प्रदेशात वसलंय एक गाव म्हणजे गारंबी. याच गारंबीत जन्माला येते एक गोष्ट, जी काळाच्या पडद्याआड जात नाही, उलट पिढ्यानपिढ्या तितकीच ताजी राहते ती म्हणजे “गारंबीचा बापू”. गावातील खोताची सत्ता आणि त्या सत्तेतून निर्माण होणारी दहशत या कथेच्या केंद्रस्थानी आहे.
View this post on Instagram
गारंबीतला अण्णा खोत हा एक निरंकुश सत्ताधीश आहे. त्याच्या जुलमी वर्तनामुळे गावकरी दबलेले असताना त्याला थेट आव्हान देणारा तरुण म्हणजे बापू. कुणाची भीड न बाळगणारा, स्वतःच्याच तालात जगणारा, अचाट आणि बेफाट वागणारा हा तरुण गारंबीत अफाट बापू म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच बंडखोर आयुष्यात येणारी राधा – श्री. ना. पेंडसे यांच्या काळाच्या पुढे जाणाऱ्या लेखणीतून साकारलेली, त्या नावाला पुरेपूर न्याय देणारी व्यक्तिरेखा आणि अण्णा खोतच्या सावटाखाली दबलेलं गारंबी गाव, हीच खरी या कथेची ओळख आहे.
प्रसाद ओक बापूच्या भूमिकेत आपल्या सहज अभिनयातून त्या कलंदर वृत्तीला जिवंत करणार आहेत. तर देविका दफ्तरदार राधाच्या भूमिकेत दिसणार असून, यतिन कार्येकर अण्णा खोतची भूमिका साकारत आहेत. याशिवाय जयवंत वाडकर मुसा, शशी पेंडसे विठोबा आणि माधवी सोमण मावशी यांच्या भूमिकेत दिसतील. या चित्रपटाद्वारे एकाधिकारशाही विरुद्धच्या संघर्षाची आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू उलगडणारी ही कथा नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने प्रेक्षकांसमोर येणार आहे.
हेही वाचा:





