Dharashiv News : दररोज दोन तास टीव्ही, फोन बंद; धाराशिवमध्ये मुलांच्या अभ्यासासाठी जकेकुरवाडीचा अभिनव उपक्रम

धाराशिव : उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे गेल्या तीन वर्षांपासून गावात मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्यात येतात. ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की, दररोज सायंकाळी सहा ते आठपर्यंत ही साधने बंद राहत असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झाला आहे. गेल्या काही वर्षांत संवादाचे माध्यम असलेल्या मोबाईल तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात अमूलाग्र बदल झाला आहे.
सध्या घरोघर टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरतात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झाली आहे. सुरुवातीला कुतूहल म्हणून लहान मुलांच्या हातात दिलेला मोबाईल त्यांच्या सवयीचा भाग बनला आहे. गावोगावी टीव्हीवर मालिका, मोबाईलमुळे लहान मुलांच्या अभ्यासावर तसेच इतर दुष्परिणाम होत आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन बावीसशे लोकसंख्या असलेल्या जकेकुरवाडीचे तरुण सरपंच अमर सूर्यवंशी यांनी यावर एक उपाय शोधला. त्यातून विद्यार्थ्यांनाही नवी दिशा मिळाली.
गावात जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. शाळेत दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांना अभ्यास करता यावा म्हणून गावात टीव्ही आणि मोबाईल दररोज दोन तास बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला ग्रामस्थांना त्यांनी या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितले. मोबाईल, टीव्ही बंद रहावेत म्हणून भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जाते. यामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली आहे. तसेच अभ्यासाचे वेळापत्रक तयार झाले असून, गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे.
नियमाचे १०० टक्के पालन
विशेष म्हणजे या निर्णयाचा गावातील इतर नागरिकांचा एकमेकांशी संवाद वाढला असून याचा चांगला फायदा झाला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, याचे शंभर टक्के पालन होत असल्याचे सरपंच सूर्यवंशी यांनी सांगितले. गावात दररोज संध्याकाळी ठरवलेल्या नियमितपणे टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. भोग्याचा आवाज कानावर पडताच घराघरातील टीव्ही, मोबाईल बंद होतो. सर्व मुले घरी जाऊन अभ्यासाला बसतात. या दरम्यान एकही मुलगा घराबाहेर पडत नाही. गावात निरव शांतता राखली जाते. हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.





