राज ठाकरेंच्या विरोधातील आंदोलन आले अंगलट; धाराशिवमध्ये 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल

धाराशिव : धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात काही मराठा तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून आरक्षणाविरोधात आंदोलन केले होते. आता हे आंदोलन या तरुणांच्या अंगलट आले आहे. हॉटेल पुष्पक पार्क येथे जमलेल्या मराठा आंदोलकांवर धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 मराठा तरुणांविरोधात विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले होते?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (5 ऑगस्ट) राज ठाकरे धाराशिव शहरात आले होते. या ठिकाणी ठाकरे यांनी सोलापूर येथे आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलक हॉटेलवर गेले होते. यावेळी राज ठाकरे यांना आंदोलकांनी भेटण्याची वेळ मागितली असता ठाकरे यांनी सुरुवातीला भेट नाकारली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी हॉटेलमध्येच घोषणा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आंदोलकांनी हॉटेलच्या बाहेर ठिय्या मांडून घोषणा दिल्या होत्या. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले होते. अतुल कुलकर्णी यांनी आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यात संवाद घडवून आणत वातावरण शांत केले होते.
‘या’ 11 जणांवर गुन्हा दाखल
मंगळवारी राज ठाकरे लातूरकडे रवाना झाल्यानंतर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये धैर्यशील गोपाळराव सस्ते (रा. येडशी), निखील जगताप (रा. माउली चौक धाराशिव), निलेश सांळुके, बलराज रणदिवे, अभिजीत सुर्यवंशी, अक्षय अंकुश नाईकवाडी (रा. कौडगाव), अमित वसंतराव जाधव (रा. नारी ता. बार्शी), हणमंत यादव, बापू देशमुख (रा. गणेश नगर धाराशिव) सौरभ गायकवाड (रा. तांबरी विभाग), तेजस बोबडे (रा. तुळजापूर) अशा 11 जणांवर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांच्यावर भा.न्या.सं. कलम 189 (2),323, 126(2) सह 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





