Dhanush: सुपरहिट चित्रपट ‘रांझणा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा हा चित्रपट अलीकडेच पुन्हा थिएटरमध्ये दाखवण्यात आला. मात्र यावेळी या चित्रपटात एक मोठा बदल करण्यात आला, तोही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने. नेमका हाच बदल पाहून अभिनेता धनुषने नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये एआयच्या वापरामुळे मूळ कथा पूर्णपणे बदलून टाकण्यात आली आहे. मूळ चित्रपटात कुंदन (धनुष) शेवटी रुग्णालयात मृत्युमुखी पडतो, तर पुन्हा प्रदर्शित केलेल्या आवृत्तीत तो जिवंत राहतो. हा बदल न पाहता आणि परवानगी न देता करण्यात आल्याने अभिनेता धनुषने नाराजी व्यक्त केली आहे. धनुषची अधिकृत प्रतिक्रिया धनुषने आपल्या एक्स हॅण्डलवरून अधिकृत नोट शेअर करत म्हटले आहे की, “रांझणा चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शनात एआयने बदललेला क्लायमॅक्स मला अजिबात आवडला नाही. यामुळे चित्रपटाचा आत्मा नष्ट झाला आहे. माझ्या स्पष्ट नकारानंतरही हा बदल करण्यात आला, त्यामुळे मी अत्यंत नाराज आहे.”धनुषने हेही सांगितले की, १२ वर्षांपूर्वी ज्या चित्रपटाशी तो जोडलेला होता, तो चित्रपट आता राहिलेला नाही. धनुषची मागणी “AI चा वापर थांबवा” आपल्या निवेदनात पुढे तो म्हणतो, “चित्रपट किंवा त्यांच्या कथांमध्ये AI चा वापर करून बदल करणं हे कलाकार आणि कलेसाठी अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे कलाकृतीची विश्वासार्हता कमी होते. अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी कठोर नियम आणि कायदे बनवायला हवेत.” दिग्दर्शक आनंद एल रायही नाराज ‘रांझणा’चे दिग्दर्शक आनंद एल राय यांनीही या बदलावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मूळ कथा आणि तिचा प्रभाव बदलल्याने चित्रपटाची भावनिक ताकद कमी झाली आहे.