“धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण…”; आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे गेल्या काही काळापासून वादाच्या केंद्रस्थानी आहेत. बीज जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत आहेत. आता स्थानिक स्वराज्य संंस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारसभेत भाषणातून भावनिक साद घालताना दिसले.
धनंजय मुंडेंचा इंदोर येथील एका हॉटेलमध्ये मर्डर होणार होता. मात्र त्यांना भय्यूजी महाराजांनी वाचवलं, असा गौप्यस्फोट रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे. शिवाय धनंजय मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याचीही माहिती आपल्याकडे आहे. मात्र आपण ती माहिती सार्वजनिक करणार नाही, असेही गुट्टे म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले रत्नाकर गुट्टे?
“धनूभाऊ, तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण भय्यूजी महाराज यांनी तुम्हाला वाचवलं, तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हे देखील मला माहिती आहे. पण मी हे सगळेच आता काढणार नाही. तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे.”
गेल्या दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभीवर गंगाखेडमध्ये सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर १६०० कोटींचं कर्ज उचललं, असल्याचा गंभीर आरोप केला होता. या टीकेला उत्तर देताना तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, असल्याचे आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले.
हेही वाचा : निवडणूक आयोगाला हायकोर्टाचा दणका; निर्णयाला न्यायालयात आव्हान, आज सुनावणी





