धनंजय मुंडेंचा राजीनामा हे केवळ नाटक : प्रणिती शिंदे

सोलापूर : बीड जिल्ह्याच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपद्धतीने हत्या करण्यात आली. मी त्यांच्या मुलीचे व पत्नीचे ऐकले तसेच त्यांच्या भावाचे ऐकले आणि खरे तर त्याच वेळी तो राजीनामा झाला पाहिजे होता. पण अतिशय निगरगट्ट असे हे सरकार आहे. हा राजीनामा एक प्रकारचे नाटक आहे. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय कारण दिले आहे. म्हणजे, त्यांना त्यांची चुक देखील स्विकारायची नाही, असे मत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.
पुढे शिंदे म्हणाल्या, थोडे जरी वाटत असते की मी याची जबाबदारी घेतो कारण हे जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावले आणि कोणाच्या ऑर्डर होत्या, तो कोणाचा माणूस होता आणि एवढेच नाही पण यांचे नाव आरोपी म्हणून पण आले पाहिजे अशी आमची मागणी आहे. याच्यावर कारवाई झाली पाहिजे.
खासकरून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमके हे कशामुळे झाले आणि कसे झाले याच्या खोलपर्यंत गेले पाहिजे. यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही हे आपल्याला दिसून येते. त्यामुळे आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव आलेच पाहिजे अशी आमची मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा : प्रणिती शिंदे
प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचं नाव सहआरोपी म्हणून या प्रकरणात आलं पाहिजे. हे पहिलं प्रकरण नाही, उघडकीस आलेलं हे पहिलं प्रकरण आहे. या जिल्ह्यात अशा अनेक निष्पाप लोकांच्या हत्या झाल्या. त्या उघडकीस आल्या नाहीत. ज्या पद्धतीने हत्या झाली ते पाहवत नाही, फोटो पाहिल्यावर लोकांना रात्रभर झोप नाही. हे सरकार मात्र निवांत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, सर्वांनाच आरोपी केलं पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.





